तळेगाव (श्याम. पंत.) : येथील वनविभागाच्या सहवन क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या शावकाचा मृत्यू झाला, तर काही अंतरावर जंगल परिसरात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. जंगलातील बिबट्याचामृत्यू तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तळेगाव वनपरिक्षेत्रातील सहवन क्षेत्रात येणाऱ्या महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या शावकाचा मृत्यू झाल्याची माहिती शुक्रवारी सकाळी वनविभागाला देण्यात आली. या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कार्यवाही करून त्यांनी लगतच्या जंगल परिसराचा शोध घेतला. तेव्हा कक्ष क्रमांक ५६ संरक्षित वनातील नाल्याजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
याची माहिती उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक व मानद वन्यजीव रक्षकांना देण्यात आली. या मृत बिबट्याचे पशुविकास अधिकारी डॉ. व्ही.बी. मडावी, पशुविकास अधिकारी डॉ. राहुल नानोटकर, डॉ. सोनाली कांबळे व डॉ. सुरेश मांजरे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी बिबट्याचे सर्व अवयव कायम असल्याचे निदर्शनास आले. याचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या झुंजीमध्ये झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
या बिबट्याचे वय साधारणत: ४ ते ५ वर्षांचे तर शावकाचे वय १ ते २ वर्षांचे असल्याचे सांगण्यात आले. दोघांचेही अवयव तपासणीकरिता पाठविण्यात आले असून, त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली. पुढील तपास उपवनसंरक्षक राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक जी.पी. बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय सूर्यवंशी, क्षेत्र सहायक निघोट, बीट वनरक्षक जाधव व वनकर्मचारी करीत आहेत.