गावात दहशत : तीन बकऱ्या ठार तर तीन गंभीर घोराड : बोर व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या घोराड गावात बिबट्याने येत अंगणात बांधून असलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात तीन बकऱ्या ठार तर तीन गंभीर जखमी झाल्या. बिबट्याने थेट गावात येत बकऱ्यांवर हल्ला चढविल्याने गावाकऱ्यांत कमालीची दहशत पसरली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास बकऱ्या ओरडण्याचा आवाज येताच रवींद्र मकरंदे यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडून कुत्रा असेल म्हणून हकलण्याचा प्रयत्न केला; पण बकऱ्यांचा फडशा पाडण्यात व्यस्त असलेल्या बिबट्याने त्यांच्या दिशेने आगेकूच केल्याने त्यांनी घराचा दरवाजा बंद केला. त्यांनी लगेच मूकबधिर शाळेत रात्रपाळीत डयुटीवर असलेले रवींद्र्र मकरंदे यांना भ्रमणध्वनीवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मकरंद घरीे येईपर्यंत तो बिबट पळून गेला होता. मकरंद यांनी घरी येताच अंगणात पाहणी केली असता तीन बकऱ्या ठार आणि तीन जखमी झाल्याचे दिसून आले. यात त्यांचे जवळपास ५० ते ६० हजाराचे नुकसान झाले. आठवड्यापूर्वी केला होता बिबट्याने हल्लाघोराड : गत अठवड्यात रात्री गावालगतच्या शेतात बिबट्याने ६ बकऱ्या ठार केल्या होत्या. यात आज बिबटाने गावात शिरून बकऱ्यांवर हल्ला केल्याने गावात दहशत पसरली आहे. सेलू येथील विकास चौकापासून घोराड कडे येणाऱ्या मार्गावर असणाऱ्या वस्तीत हा बिबट आला कसा असा प्रश्न निर्माण होत आहे. हा बिबट जवळपासच वास्तव्यास तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनावरे आता मोकळ्या खुल्या जागेत बांधल्या जात असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभित झाले आहेत.(वार्ताहर)
अंगणात बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला
By admin | Published: March 28, 2017 1:00 AM