आष्टी (शहीद) : तालुक्यातील लहान आर्वी शिवारामध्ये शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लहान आर्वी शिवारातील जंगला शेजारी भीमराव उईके यांचे शेत असून ते शुक्रवारी सकाळी शेतामध्ये गेले असता त्यांना दुर्गंधी यायला लागली. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून बघितल्यावर बिबट मृतावस्थेत आढळून आला. याची माहिती त्यांनी पोलिस पाटील देवानंद पाटील यांना दिली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. बिबट्याचा मृतदेह बाहेर काढला असता हा बिबट दोन वर्षाचा असावा,असा अंदाज वर्तविण्यात आला.
बिबट्याचा पंचनामा करून आर्वी येथील पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. उत्तरीय तपासणीअंती बिबट्याच्या मृतदेहाला जंगलाच्या शेजारी अग्नी देण्यात आली. यावेळी आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी योगानंद उईके,वनपाल विकास चौधरी, रुपेश ठाकरे, वनरक्षक रसिका अवथडे, नीलम राठोड, सारिका पिदूरकर, मीनाक्षी राठोड, स्वाती वानखडे, स्वाती केंद्रे, गणेशपुरे, वनमजूर सुरेश कुंबरे, गजानन खंते यांची उपस्थिती होती.
आतपर्यंत सहा बिबट्यांचा मृत्यू
तालुक्यामध्ये बिबट्याच्या मृत्यूचे सत्र सातत्याने सुरू आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सहा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. आबाद किन्ही,वर्धपूर व खंबित या शिवारात प्रत्येकी एक तर तळेगाव शिवारात दोन बिबट मृत पावले आहे. आता लहान आर्वीमध्ये ही एक बिबट विहिरीत मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.