वर्धा : सावंगी (मेघे) येथील शालिनीताई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीवर रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्याला सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास बिबट आढळून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सहा तासाच्या थरारानंतर बिबट्याचे सुरक्षित ‘रेस्क्यू’ करण्यात वन विभाग, पीपल फॉर ॲनिमल आणि पोलिसांना यश आले. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांसह रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. त्याने याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत तात्काळ वन विभागाला व पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालय परिसर गाठून पाहणी केली असता, बिबट रुग्णालयाच्या फाटकाच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर बसून असलेला दिसून आला. वन विभागाची चमूही घटनास्थळी दाखल झाली. पाहता पाहता बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली.
बिबट्याने झाडावरून उडी घेत थेट फाटकाबाहेर असलेल्या लगतच्या नालीत शिरला आणि मग सुरू झाला त्याला पकडण्यासाठी थरारक प्रवास. अखेर ८.२५ वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन ३.५६ मिनिटांनी संपले असून, बेशुद्ध करण्याच्या औषधाचा मारा करून त्याला सुरक्षितरीत्या नालीबाहेर काढून रेस्क्यू करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, संजय इंगळे तिगावकर तसेच उपवनसंरक्षक शेपट, तहसीलदार रमेश काळपे तर सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, पीपल फॉर ॲनिमलचे आशिष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे आदींची उपस्थिती होती.
असे झाले ‘रेस्क्यू ऑपरेशन’
- सकाळी ८.२५ वाजता बिबट कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या इमारतीवरील एसीच्या खाली बसून असलेला दिसला.
- कर्मचाऱ्यांनी बिबट्याला हुसकावून लावल्यावर तो परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर जाऊन बसला.
- ८.३० वाजताच्या सुमारास बिबट लगतच्या नालीत जाऊन शिरला.
- ९.०० वाजताच्या सुमारास पोलीस विभागाची टीम आणि वन विभागाच्या टीमकडून बिबट्याला सुरक्षित काढण्याची तयारी सुरू झाली.
- ९.४५ वाजताच्या सुमारास जेसीबीला पाचारण करण्यात आले.
- १० वाजतापासून नालीत शिरलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.
- अखेर ३.५६ मिनिटांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याच्या औषधीचा मारा करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
नागरिकांची उसळली गर्दी
सावंगी रुग्णालय परिसरात बिबट असल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर रुग्णालय परिसरात बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. काही नागरिक भरउन्हात छतावर बसून होते तर रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीही सहा तास उन्हात बिबट निघण्याची वाट पाहत होते.
जेसीबीने खोदली नाली
बिबट नालीत शिरल्याने त्याला नालीबाहेर येता येत नव्हते. नाली अगदी छाेटी असल्याने त्याला बाहेर निघण्यासाठी सुरक्षित मार्ग दिसत नसल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाला मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर एका बाजूने नाली खोदण्यात आली आणि दुसऱ्या बाजूने प्लास्टिक पाईपने टोचून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर बिबट्याच्या कंबरेच्या भागावर इंजेक्ट करून त्याला बेशुद्ध केले. नाली खोदून बिबट्यास सुरक्षित बाहेर काढण्यात आले.