लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता झालेल्या सोडतीमध्ये १ हजार १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. तर तेवढ्याच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीही पोर्टलवर जाहीर करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु तरीही ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून ३०८ विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्याक दर्जा वगळता) शाळांमध्ये पहिली व नर्सरीकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यामधील ११४ शाळांतील १ हजार ११५ जागांकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातून ३ हजार ९१४ अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी राज्यभरात ‘लॉटरी’ काढण्यात आली. यामध्ये १ हजार १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता प्रवेशाकरिता एसएमएस पाठविण्यात आले. त्यानंतर २० एप्रिलपर्यंत प्रवेशाकरिता मुदत देण्यात आली होती; पण कालावधीत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे प्रवेशाकरिता १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता प्रवेशाची मुदत संपली असून केवळ ८०० विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला असून ३०८ विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यामध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत १ हजार १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या शाळेमध्ये जाऊन प्रवेश करणे अपेक्षित होते. एकदा मुदतवाढ दिल्यानंतरही निवड झालेल्यांपैकी ३०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे आता त्यांना प्रवेश मिळणार नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. लिंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक