असाही सवाल : पक्ष भ्रष्टाचाराच्या बाजूने की विरोधात?वर्धा : तालुक्यातील तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन पक्षश्रेष्ठीने तक्रारकर्त्या कार्यकर्त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. या आधारे सदर कार्यकर्त्यानेही पक्षश्रेष्ठींना खळबजनक खुलासा सादर केल्याने भाजपची कसोटी पणाला लागली आहे.जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत वंजारी असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांच्यासह विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, रामदास तडस, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह यांना पत्र पाठवून पक्षाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.सदर पत्रानुसार, १५ आॅगस्टला झालेल्या तळेगावच्या ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून नागरिकांनी निवड केली. ग्रामसभेत ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण नागरिकांनी उपस्थित केले. मात्र यावर सचिव व सरपंच व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाही. सभाध्यक्ष या नात्याने ग्रामसभा ठराव पुस्तिकेत नोंदवून त्याची प्रत द्यावी व चौकशीकरिता गावकऱ्यांसोबत यावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. त्यांची मागणी मान्य केली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाचा कुठेही उल्लेख नव्हता. ही बाब लक्षात घेऊन ग्रामसभेमध्ये पक्षाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मात्र भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम केले, याकडेही लक्ष वेधले आहे. कथित भ्रष्टाचाराच्या बाजुने राहणारे जि.प. शिक्षण सभापती यांच्या सुचनेवरुन आपले मत जाणून न घेता कारणे दाखवा नोटीस बजावली. सध्या वर्धा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात झालेल्या तथाकथित भ्रष्टाचाराचे प्रकरण राज्यभर गाजत असून पक्षाची प्रतीमा मलीन झाली. या बाबत सदर शिक्षण सभापतीला आपण कोणती कारणे दाखवा नोटीस दिली, असा गंभीर सवालही वंजारी यांनी पत्रातून केला आहे. या सर्व विषयाला अनुसरुन पक्षश्रेष्ठींचा वा पक्षशिस्तीचा भंग केला, असे कोअर कमिटीला वाटत असेल, तर आपण भ्रष्टाचार करणाऱ्याच्या बाजुनेकी, भ्रष्टाचाराचा विरोध करणाऱ्याच्या बाजुने आहेत, हे स्पष्ट करावे, असा थेट सवाल जिल्हाध्यक्षांनाच केला आहे. कोअर कमिटी जो निर्णय घेईल, पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्या आदेशाचे पालन करील, असेही शेवटी पत्रात नमुद केले आहे. यावरुन भाजपश्रेष्ठी काय भूमिका घेते, याकडे जनतेसह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)
‘त्या’ कार्यकर्त्याचे भाजपश्रेष्ठींना खळबळजनक पत्र
By admin | Published: September 06, 2015 2:06 AM