वर्धा : तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. एक वर्ष कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी १ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी तृतीयपंथीयांनी ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारित असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रयत्न करत आहे. या दरम्यान तृतीयपंथीयांचे गुरू, दयार यांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधण्यात आला. यातून असे लक्षात आले की, तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे असून, त्यांना पाठ्यवृत्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक कार्यालयाच्या वतीने तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ही पाठ्यवृत्ती तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून, इच्छूक तृतीयपंथीयांनी १० जूनपर्यंत गुगल अर्जावर माहिती भरून अर्ज सादर करावे. या संदर्भात अधिक माहितीकरिता मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच साधना गोरे यांच्या ९९८७७७३८०२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.