वायगाव (नि.) : नजीकच्या सिरसगाव (ध.) येथील अनेक वर्षापासून बसविण्यात आलेल्या विद्युत तारा अधिक भारामुळे व वादळामुळे तुटून पडत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. ही बाब निदर्शनास येऊनही महावितरण मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून तारे तुटल्यावर फक्त डागडुजी केली जाते. पण वाढत्या भारामुळे व ठराविक मर्यादा ओलांडूनही नवीन वीजतारा बसविण्यात आल्या नसल्याने तारा वारंवार तुटत आहे. गावातील बहुतांश विद्युत खांब वाकले आहे. त्यामुळे विद्युत तारा या लोंबकळत आहे. गावातून आवागमन करताना तारा तुटून ग्रामस्थांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिरसगाव (ध.) येथून आलेल्या विद्युत तारा जुन्या आहेत. या तारांना जागोजागी जोडणी देवून वीजपुरवठा सुरळीत केला जात असल्याचे दिसून येते. या तारा बहुतांश ठिकाणी लोंबकळत आहेत. शिवाय गावातील खांब वाकले असल्याने तारांचे घर्षण होत असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. यात अपघात होण्याची शक्यता नेहमीचीच आहे. या समस्येबाबत शिरसगावचे उपसरपंच अमोल उघडे यांनी वायगाव (नि.)च्या कनिष्ठ अभियंत्याकडे वारंवार तक्रार केली. मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. ग्राम पंचायतमध्ये या बाबत ठरावही घेण्यात आला. आणि तो ठराव देवळी येथील मुख्य कार्यालय आणि वायगाव (नि.) विद्युत उपकेंद्र यांना देण्यात आला. पण अद्याप कुठलिही दुरूस्ती करण्यात आलेली नाही. तारा बदलवून विद्युत खांब व्यवस्थित करण्याची गरज व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
तुटलेल्या तारांमुळे जीवितास धोका
By admin | Published: June 25, 2014 12:37 AM