बोंदरठाणा शिवारातील घटना : वादळासह पावसाचा कहर कांरजा (घाडगे) : तालुक्यातील सारवाडी परिसरात वादळी वारा व पावसाने चांगलाच कहर केला. यात बोंदरठाणा शिवारात वीज कोसळल्याने दोनजण जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मृतकांची नावे उकंडराव देशमुख व श्रीराम गिऱ्हाळे अशी आहेत. शिवाय या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. बोंदरठाणा शिवारात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला. यावेळी शिवारातील प्रशांत जोशी यांच्या शेतात रस्त्याचे काम सुरू होते. पावसासह विजांचा कडकडाटही होत होता. दरम्यान रस्त्याच्या कामावर असलेल्या उकंड बापुराव देशमुख (४५) व श्रीराम किसनाजी गिऱ्हाळे (४५) दोन्ही रा. बोंदठाणा हे शेजारी असलेल्या महादेव मानमोडे यांच्या शेतातील झाडाच्या आश्रयाला गेले. दरम्यान त्याच झाडावर वीज कोसळली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती तलाठी सी.एम. कुटे यांनी दिली. मृतक उकंडराव यांच्या मागे दोन मुले, पत्नी व श्रीराम यांच्या मागे मुलगा मुलगी तथा पत्नी असा आप्त परिवार आहे. मृतक दोघेही अल्पभुधारक शेतकरी आहे. आर्वी उपविभागात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने थैमान घातले आहे. यात काल सेलगाव (लवने) परिसरात आलेल्या पावसामुळे कापणीवर असलेले सोयाबीन जमिनदोस्त झाले तर बोंडावर आलेली कपाशी पाऊस व वाऱ्यामुळे वाकून गेली. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुसानीचा फटका सहन करावा लागत आहे. आज पुन्हा याच उपविभागातील कारंजा तालुक्यात वादळाने कहर केला. याचा फटका शेतात कापणीवर आलेल्या सोयाबीनला बसला. त्यांचे सोयाबीन जमिनदोस्त झाले. यामुळे दिवाळीपूर्वी सोयाबीन विकण्याच्या येथील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. कृषी विभागाच्यावतीने झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शासनाची मदत त्यांच्याकरिता निरुपयोगी ठरत असल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
वीज कोसळली; दोन ठार
By admin | Published: October 07, 2014 11:37 PM