शेतकरी, शेतमजूर, निराधार त्रस्त : अनेकांना रित्या हातानेच जावे लागतेय परत लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : स्थानिक सेंट्रल बँकेची लिंक मंगळवारपासून फेल आहे. यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, खातेधारकांचे हाल होत आहेत. बँक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. पवनार लगत कान्हापूर, गोंदापूर, वाहितपूर व मोर्चापूर येथील ग्रामस्थ बँकेचे खातेदार आहेत. सेलूचा आठवडी बाजार मंगळवारी भरत असल्याने या परिसरातील रोजमजुरी करणाऱ्यांचा मजुरीचा व्यवहार हा रोखीने करावा लागतो; पण बँकेची लिंक नसल्यामुळे खातेदारांना रोख मिळू शकत नाही. एटीएमही मागील महिन्याभरापासून ‘नो कॅश’ या सदराखाली बंद आहे. या प्रकारामुळे शेतकरी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लिंक नसल्याने शेतकरी, शेतमजूर, निराधार या सर्वांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या लग्नसराई असल्याने ज्यांच्याकडे लग्न आहे, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक घरी मोबाईल असला तरी अद्याप कॅशलेस व्यवहार लोकांच्या पचनी पडलेले नाही. लिंक आमच्या हातात नसल्याने या अडचणी आम्ही दूर करू शकत नाही, असे म्हणत व्यवस्थापक हात वर करीत आहे. यामुळे खातेधारक भरडले जात आहेत. नोटबंदीच्या काळात बँकांमध्ये गर्दी होत होती. आत लिंक फेलमुळेही बँकेमध्ये तशीच गर्दी अनुभवास येत आहे. या प्रकारामुळे ग्राहकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, खातेदारांत असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
लिंक फेलमुळे बँकांतील व्यवहार ठप्प
By admin | Published: May 12, 2017 12:56 AM