लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्रास खुलेआम दारू विकली जात आहे. विशेष म्हणजे केवळ मध्य प्रदेशात विक्रीची परवानगी असलेले विदेशी मद्य धडाक्यात येथे विकले जात आहे. यामुळे मद्य प्राशन करणाऱ्यांना विविध आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्याला थोर महापुरुषांचा वारसा आहे. त्यांच्या जिल्ह्याची ओळख देशात झाली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला वास्तव्य केले. तेथून अनेक चळवळी चालविल्या. विनोबा भावे यांनी स्वातंत्र्यानंतर भूदान चळवळ चालविली. त्यामुळे या जिल्ह्याला देशात आगळेवगळे स्थान आहे. त्याचीच दखल घेत शासनाने १९७४ मध्ये जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. एकाअर्थाने ती महात्मा गांधी, विनोबा भावे यांना आदरांजली होती त्यांच्याप्रति शासनाने कृतज्ञता व्यक्त केली होती. मात्र, कालांतराने दारूबंदी फसवी निघाली. हा निर्णय केवळ कागदावरच राहिला.
राज्यात दारूबंदीसाठी उत्पादन शुल्क विभाग निर्माण करण्यात आला आहे. त्यांच्या साथीला पोलिसही आहेत. मात्र, जिल्ह्यात दारूबंदीची पुरती वाट लागली आहे. पोलिस केवळ आपल्या 'सोयी'ने धाडसत्र राबवीत असल्याची चर्चा होऊ लागली आहे. उत्पादन शुल्क विभाग तर कधीच दारूविक्री अथवा साठ्यावर धाड टाकताना दिसत नाही. मग या विभागाची जिल्ह्यात गरजच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस अनेकदा कारवाई करून वाहनांसह लाखोंचा साठा जप्त केल्याचा गवगवा करतात. आपली पाठ थोपटून घेतात. नंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' असा कार्यक्रम सुरू होतो. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कार्यकाळात जानेवारी ते मे दरम्यान १४ कोटी ४ लाख ८६ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. मात्र, आता ही कारवाई काहीशी थंडावल्याचे चित्र दिसून येते. शहरासह जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री सुरू आहे.
दारूविक्रेते शिरजोर झाले आहे. विशेष म्हणजे अनेक पोलिसांनाही कुठे दारू विकली जाते, याची इत्थंभूत माहिती आहे. मात्र, कारवाई करण्यास त्यांचे हात धजावताना दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
लगतच्या जिल्ह्यातून होतो पुरवठाजिल्ह्याशेजारी नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्हे आहे. तेथे दारूबंदी नाही. या जिल्ह्यातून येथील दारूविक्रेते दारू आणतात. काही विक्रेते थेट मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीची दारू आणतात. ही दारू चढ्या दराने ग्राहकांना विकली जाते. अनेकदा बनावट दारू विकली जाण्याचाही धोका असतो. यामुळे पिणाऱ्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. मात्र, विक्रेत्यांना केवळ पैशाचा हव्यास दिसून येतो.
चिरीमिरी'मुळे निर्वावले, 'वर्दी'चा वचक दिसेना काही पोलिसांचे दारू विक्रेत्यांशी 'अर्थपूर्ण साटेलोटे असल्याची चर्चा आहे. अनेकदा 'चिरीमिरी' घेऊन प्रकरण दडपले जाते. यामुळे दारू विक्रेते निर्वावले आहे. त्यांना वर्दी'चा धाक उरला नाही. 'वर्दी'च आता 'दर्दी झाल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर खुद्द जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांच्या 'डीबी पथकात कार्यरत असलेले कर्मचारीच खुलेआम दारू ढोसण्यासाठी जात असल्याचेही सांगितले जाते.
फोन करा अन् दारू मागाशहरात अनेक दारू विक्रेते फोन केल्यास इच्छितस्थळी दारू पोहोचवून देतात. फोन करा अन् दारू मागवा, असा हा अफलातून प्रकार आहे. काही ठिकाणी अगदी बारप्रमाणे टेबल, खुर्चा टाकून पेग रिचविले जाते. काही ठिकाणी सत्यम, शिवमचा आव आणत 'एमपी'ची दारू विकली जाते. विशेष म्हणजे पोलिस विभागातील अनेकांना दारुविक्रीची माहिती आहे. तरीही कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशीच स्थिती दिसून येत आहे. नवीन पोलिस अधीक्षक याकडे काळजीने लक्ष देऊन 'झारीतील शुक्राचार्यां'ना शोधून काढतील का, हा खरा प्रश्न आहे. सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने दारुचे पाट वाहण्याची शक्यता आहे.