लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सीबीएसई बारावीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यात वर्धा जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनच्या प्रतीक भूत याने पटकाविला आहे.जिल्ह्यात सीबीएसई बोर्डशी संलग्न शाळांमध्ये सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालय, भवन्स लॉयड्स विद्या निकेतन, अल्फोन्सा विद्यालय, पुलगाव येथील केंद्रीय विद्यालयाचा समावेश आहे. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही निकालाची प्रतीक्षा होती. आज निकाल जाहीर झाल्याने त्याला पूर्णविराम मिळाला आहे. भवन्स लॉयड्स विद्या निकेतनच्या प्रतीक भूत याने ४८५ गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर द्वितीय स्थान ९६ टक्के गुण घेत प्रियांशू सोमानी याने पटकाविले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही विद्यार्थी भवन्स लॉयड्स विद्या निकेतन भूगाव येथील वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणारे आहेत. पुलगावच्या केंद्रीय विद्यालयातील गौरव केशरवानी ९५.८ टक्के व मानसी सिकरवार हिने ९५.२ टक्के गुण घेऊन त्यांच्या विद्यालयातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकाविला.तसेच जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे या केंद्र शासन संचालित निवासी विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून ९५.६ टक्के गुण घेऊन प्रज्वल नासरे हा प्रथम तर ९३.४ टक्के गुण घेऊन हार्दीकी राजुरकर ही द्वितीय आली आहे. तर अल्फोन्सा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे असले तरी या विद्यालयातील एकही विद्यार्थी गुणाच्या टक्केवारीची नव्वदी पार करू न शकल्याचे सांगण्यात आले.
लॉयड्स विद्यानिकेतनचा प्रतीक भूत बारावीच्या परीक्षेत अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 9:19 PM
सीबीएसई बारावीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यात वर्धा जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनच्या प्रतीक भूत याने पटकाविला आहे.
ठळक मुद्देसीबीएसईचा निकाल : जवाहर नवोदयचा निकाल शंभर टक्के