शासकीय सुटी नसताना कार्यालय बंद : कामाकरिता आलेल्या नागरिकांची हेळसांड आर्वी : गत चार दिवसांपासून आर्वी न.प. च्या कर्मचाऱ्यांनी थकित वेतनाच्या मागणीकरिता आमरण उपोषण सुरू केले. शुक्रवारी या आंदोलनाला पाच दिवस होत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली तरी यावर कुठलाही मार्ग निघाला नाही. या संपात पालिकेचे कुलूप उघडणारा कर्मचारी सहभागी असल्याने शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत कार्यालयाचे कुलूपच उघडले नसल्याचे दिसून आले आहे. पालिका कार्यालय उघडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्यकार्यालय, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, कर विभाग, विद्युत विभाग कार्यालयाचे कुलूपच उघडले नाही. त्यामुळे पालिका कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागले. शासकीय सुटी नसताना न.प. कार्यालय बंद कसे या संबंधित शहरात चर्चेचा विषय बनला होता. असे असताना जोपर्यंत आमरण उपोषणाला न.प.च्या सर्व कर्मचारी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. सध्य:स्थितीत आर्वी नगर पालिकेजवळ एक महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कमेची व्यवस्था नसल्याचे कळविले आहे. याला यावर्षी नगरपालिकेची कमी झालेली टॅक्स वसुली जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या कमी वसुलीमुळेच कर्मचाऱ्याचे पगार थांबले, असे संबंधितांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी) नगरपालिका मुख्य कार्यालयाला कुलूप असून ते कोणत्या व्यक्तीने लावले या संदर्भात मला अजूनपर्यंत माहित पडले नाही. या बाबत संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस देऊन विचारणा करण्यात येईल. - गणेश शिंदे, मुख्याधिकारी,न.प. आर्वी
पालिकेच्या कार्यालयाचे कुलूप उघडलेच नाही
By admin | Published: August 20, 2016 1:56 AM