देवळी : स्थानिक शासकीय विश्रामगृह बांधकामाच्या टॉवरचा स्लॅब कोसळल्याने २ मजूर जखमी झाले. सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान ही घटना घडली. जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामेश्वर रामनाथ केराहे (२९), रा. सीनार करोटी बालाघाट व रितेश काजळकर रा. गोंदिया असे जखमींचे नाव असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवळीच्यावतीने अडीच कोटीच्या खर्चातून हे बांधकाम सुरू आहे. स्लॅबचे बांधकाम सुरू असताना विभागच्या कोणताही तांत्रिक अधिकारी हजर नसल्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे.यवतमाळ मार्गावरील जुन्या विश्रामगृहालगतच सुसज्ज अशा नवीन विश्रामगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या बांधकामचा कंत्राट पगडाल यांच्याकडे असून साईट इन्चार्ज म्हणून अभियंता पठाण जबाबदारी सांभाळत आहे. वास्तूचे बरेचशे बांधकाम झाले असून घटनेच्या वेळेस १५ बाय २० चौरस फुटाच्या टॉवरचा स्लॅब भराईचे काम सुरू होते. यावेळेस हा स्लॅब कोसळल्याने यामध्ये रामेश्वर रामनाथ केराहे व रितेश काजळकर हे जखमी झाले. हे दोघेही कारागिर घटनेच्या वेळेस स्लॅब भराईचे काम करीत होते.(प्रतिनिधी)
विश्रामगृहाचा स्लॅब कोसळला; दोघे जखमी
By admin | Published: April 20, 2015 1:51 AM