लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे. गेल्यावेळी ‘मोदी’ लाटेवर स्वार असलेल्या भाजपला यावेळी कस लागणार आहे. तर कॉँग्रेस पक्ष हा गड खेचून आणण्यासाठी कामाला लागला आहे. कॉँग्रेससाठी बसपा अन् वंचित बहुजन आघाडी अडसर ठरत असून यांच्या मतविभाजनावरच या निवडणुकीचा निकाल राहणार आहे.२०१४ मध्ये वर्धा मतदार संघातच नव्हे तर देशात मोदी लाटेने अनेक मतदार संघाचे निकाल बदलून टाकले. शिवाय प्रचंड मताधिक्याने उमेदवार विजयी झालेत. तीच परिस्थिती आता राहिलेली नाही. ‘अंडरकरंट’ असल्याचा दावा भाजप करीत असले तरी मतदार संघात भाजप-कॉँग्रेस दोघांचाही कस लागणार आहे. १७ लाख २३ हजार २९५ मतदार आहेत. गेल्यावेळपेक्षा १ लाख ८० हजार ४०३ मतदार वाढले आहे. हे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात जाते, हे महत्वाचे राहणार आहे.कॉँग्रेस पक्षाची भिस्त नेहमीप्रमाणेच पारंपरिक मतदारासह दलित, मुस्लिम मतावर आहे. गेल्यावेळी दलित, मुस्लिम, आदिवासी मतांमध्ये भाजपने मुसंडी मारली होती. मात्र, यावेळी ही मते भाजपकडे वळविणे त्यांच्यासाठीही कसोटी आहे. ही मते थेट कॉँग्रेसकडे गेली असती; पण वर्धा लोकसभा मतदार संघात बहुजन समाज पक्षाकडून शैलेश अग्रवाल व वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी निवडणूक लढत आहेत. अग्रवाल यांनी कॉँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, त्यांना कॉँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ते बसपाकडून मैदानात आहेत. बसपाने दलित मते आपल्याकडे ओढून नेली तर कॉँग्रेसची अडचण होवू शकते. याशिवाय वंचित बहुजन आघाडी दलित, मुस्लिम दोनही मते आपल्याला मिळतील, असा दावा करीत आहेत.अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चार-पाच महिन्यांपूर्वी वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीचा शुभारंभ केला होता. त्यामुळे या आघाडीचे काम निवडणुकीतही दिसण्याची चिन्हे आहेत. तरूण मुस्लिम मतदार यांच्यावर सदर आघाडीचे लक्ष आहे. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाला परंपरागत व्होटबॅँकसह दलित, मुस्लिम मते आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.वर्धा लोकसभा मतदार संघात ६ टक्के मुस्लिम तर १५.४३ टक्के दलित मतदार आहेत. शिवाय हेच मतदार निवडणुकीचा निकाल निश्चित करणारे आहेत. यंदा भाजपलाही गेल्यावेळऐवढे मताधिक्य टिकवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचीही कसोटी यानिमित्ताने लागणार आहे. त्यामुळेच भाजप, कॉँग्रेस व बसपा, वंचित बहुजन आघाडी या सर्वांकडून त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांवर भर दिला जात आहे.‘आप’ची मते कुणीकडेगेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून वर्धा लोकसभा मतदार संघात मुस्लिम समाजाचा उमेदवार देण्यात आला होता. त्या उमेदवाराने १५ हजार ७३८ मते मिळविली. यावेळी रिंगणात आपचा उमेदवार नाही व एकही मुस्लिम उमेदवारही मैदानात नाही. त्यामुळे आपची मते व मुस्लिम समाजाची मते कुणाकडे जाते हेही अंत्यत महत्वाचे राहणार आहे. मुस्लिम समाजातील महिला आपल्याकडे येतील असा दावा भाजपचे अभ्यासू कार्यकर्त्यांच्या आधारावर करीत असले तरी याचा निकाल मतमोजनीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Lok Sabha Election 2019; मतविभाजनावर ‘खेळ’ अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:38 PM
वर्धा लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे. गेल्यावेळी ‘मोदी’ लाटेवर स्वार असलेल्या भाजपला यावेळी कस लागणार आहे. तर कॉँग्रेस पक्ष हा गड खेचून आणण्यासाठी कामाला लागला आहे.
ठळक मुद्देभाजप अन् काँग्रेसचा लागतोय कस : बसपासह वंचित बहुजन आघाडी अडसर