लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असा गवगवा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांचा दुष्काळ होता. परिणामी, नागरिकांची उन्हामुळे होरपळ शिवाय पाण्याविना घशालाही कोरड पडलेली होती.लोकसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांची संख्या दुप्पट करून मेडिकल किट, मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांकरिता वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन, रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या होत्या.या सूचनेनुसार मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार, वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रावर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता सावलीसाठी मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु,बहुतांश मतदान केंद्रावर यातील सुविधाच उपलब्ध झाल्या नसल्याचे दिसून आले.काही मतदान केंंद्रावर दहा बाय दहाचा मंडप टाकण्यात आला. यामुळे मतदारांना उन्हाचे चटके सहन करीतच मतदान करावे लागले. मतदान केंद्रावर उन्हाची तीव्रता लक्षात घेता थंड पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु, पाण्याचीही व्यवस्था मतदान केंद्रावर नव्हती. पाळणाघर व वैद्यकीय सहाय्यकांचा तर पत्ताच नव्हता. यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्रीच सेवा व सुविधांची व्यवस्था केल्याचे निदर्शनास आले. सुविधा नसल्याने मतदारांनाही याचा नाहक त्रास झाला.मतदार म्हणतात, कंत्राटदार-अधिकारी मालामालनिवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावरील सुविधा पुरविण्याकरिता निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. यावर्षीही सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात सुविधांची वानवा दिसून आल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मतदान केंद्रावर मंडप टाकण्याचा कंत्राट दिल्याची माहिती आहे. या कंत्राटदाराने उभारलेले मंडप हे सात हजार रुपये किमतीचे असल्याचीही चर्चा मतदान केंं द्रावर सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हजार ते पंधराशे रुपयालाही महाग असलेल्या या मंडपावर इतका मोठा खर्च कसा काय? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. तर व्हीलचेअरही ग्रा.पं.कडून पुरविण्यात आल्या. त्यामुळे निवडणुकीचा निधी मोठ्या प्रमाणात कंत्राटदार व अधिकारीच गडप करीत असल्याचा आरोप होत आहे.पोलिसांनी बीएलओंना दाखविला बाहेरचा मार्गमतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना त्यांचा मतदार यादीतील क्रमांक शोधण्याकरिता तसेच त्यांना चिठ्ठी देण्याकरिता वर्धा शहरातील रामनगरस्थित चित्तरंजनदास या शाळेतील मतदान केंद्रावर बीएलओ बसलेले होते. ते मतदान प्रक्रि येकरिता सहकार्य करीत असताना रामनगर पोलिसांनी त्यांना मतदान केंद्र परिसरात बसण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांना उन्हातच बसून कर्तव्य बजावावे लागले. पोलिसांच्या या वागणुकीमुळे मतदारांनी रोष व्यक्त केला.स्थानिक कर्मचाऱ्यांकडे दाखविले बोटदेवळी व वर्धा तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर मंडपाची व्यवस्थाच नव्हती. ज्या ठिकाणी मंडप टाकण्यात आला तोही अपुरा पडल्याने मतदारांना त्रास झाला. पाण्याचीही व्यवस्था नव्हती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी तलाठी, पोलीस पाटील यांना यांच्याकडे बोट दाखविले. परंतु, ही जबाबदारी निवडणूक आयोगाने प्रशासनाकडे सोपविली असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले, हे विशेष.
Lok Sabha Election 2019; मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सेवा-सुविधांचा ‘दुष्काळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:41 PM
लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असा गवगवा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांचा दुष्काळ होता.
ठळक मुद्देनियोजन केवळ कागदोपत्रीच : उन्हाच्या झळांमुळे मतदारांची होरपळ, काही ठिकाणी साधे पिण्याचे पाणीही नाही