लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा या महापुरुषांनी जातीपातीचा विचार न करता सामान्य माणसाला समृद्धेचा व संपन्नतेचा मार्ग दिला. प्रधानमंत्र्यांचा मुलगा प्रधानमंत्री, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार अशी घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भारतीय जनता पार्टी साधणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.भाजपा-सेना महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. गरीबी, शेतकऱ्याला कोणतीही जात-पात नसते. हे सांगून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सातबारा कोरा व इतर सर्व प्रकारची शासकीय मदत देवून राज्यांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने देशातील १ लाख ६० हजार गावांना रस्त्यांनी जोडून सामान्य माणसाचा मार्ग सुकर केला. तर मेट्रो रेल्वे मार्गातून सामान्य माणसाची पावले गतीमान केली. देशातील संविधान तोडण्याची भाषा करणारी मंडळी दुसरी तिसरी कोणी नसून कॉँग्रेसच आहे. याच सरकारने ८० वेळा संविधानाचा बदल करण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती आरोप याप्रसंगी गडकरी यांनी केला. गेल्या पाच वर्षातील वर्धा जिल्ह्याच्या विकासाचे खरे श्रेय भाजपा खा. रामदास तडस यांना जाते. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाचे विविध प्रकल्प ३ वर्षात बडनेरा-नागपूर मेट्रो, पुलगाव-आर्वी शंकुतला ट्रेनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर, वर्धा जिल्ह्यात मेट्रो ट्रेन निर्मिती कारखाना व इतर प्रकल्प राबवून राज्यातील रस्ते विकसीत करून यासाठी आमचे शासन कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. स्थानिक सर्कस ग्राऊंडवर दुपारी ३ वाजता पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना शासनाच्या विकासाचा आढावा घेत रामदास तडस म्हणजे हात दाखवा एस.टी. थांबवा अस व्यक्तीमत्व असल्याची कोपरखळीही त्यांनी केली. याप्रसंगी व्यासपीठावर खा. डॉ. विकास महात्मे, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे, सेनेचे माजी खासदार अनंत गुढे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, मिलिंद भेंडे, नगराध्यक्ष शितल गाते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळु शहागडकर, अॅड. माथने, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, विजय आगलावे, संजय गाते, वैशाली येरावार, प्रविण सावरकर आदींची उपस्थिती होती.
Lok Sabha Election 2019; घराणेशाहीला संपवून देशाचा विकास साधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 9:33 PM
प्रधानमंत्र्यांचा मुलगा प्रधानमंत्री, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार अशी घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भारतीय जनता पार्टी साधणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही वचनबद्ध