लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अॅड. चारुलता खजानसिंग टोकस यांच्या प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. त्यांच्या प्रचारातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अंग काढून घेतले आहे. तर रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या प्रचारावर जाहीर बहिष्कारच टाकला असल्याने अॅड. टोकस कमालीच्या अडचणीत आल्या आहेत. रिपाइंचे कार्यकर्तेसुद्धा अशीच भूमिका घेऊन असल्याचे त्यांच्याच नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.अॅड. चारूलता टोकस यांनी निवडणुकीच्या तोंडावर रामनगरात सर्कस मैदानजवळ राठी यांचा बंगला भाडे तत्त्वावर घेतला आहे. तेथूनच त्यांच्या प्रचाराची सुरुवात होते. यांच्यासमवेत पक्षाचा एकही ज्येष्ठ नेता सोबत असल्याचे दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या सद्भावना भवनातून काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात होत होती, ते सद्भावना भवन प्रचाराच्या रणधुमाळीत यंदा बंद राहात असल्याचे दिसून आले. गटागटांत विखुरलेल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे मनोमिलन अजून झालेले नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी टोकस यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ आपल्या कोेट्यात घ्यावा याकरिता बरेच प्रयत्न केले. त्यांच्या बुटीवाड्यात राकाँ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. शिवाय आपल्या भावना पक्षाच्या नेत्यांना कळविल्या. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यातच ठेवण्यात आला. त्यांची प्रखर नाराजी राकाँच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये दिसून येत आहे. तरूण नेते काँग्रेसच्या प्रचारावर बहिष्कारच टाकून आहेत. बाहेरून येऊन उमेदवारी आमच्यावर लादली जाते. आम्ही वर्षानुवर्षे आंदोलन करतो शिवाय काँग्रेस आमच्या बळावर निवडून येते. हे आता चालणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याने काँग्रेस उमेदवाराला दिला असल्याची माहिती पक्षाच्या वर्तुळातून दिली जात आहे. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांना हा मतदारसंघ स्वाभिमानला देण्यासाठीही गळ घातली होती; पण अॅड. टोकस यांना उमेदवारी खेचून आणण्यात यश आले. आता राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चारुलता टोकस यांच्या प्रचारातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे प्रचाराची धुरा स्वत: सांभाळावी लागत असून काँग्रेसचे संपूर्ण सहकार्य दिसत नाही.काय आहे राकाँ नेत्यांच्या नाराजीचे कारणवर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ही सत्ता असताना ही बँक डबघाईस आली. त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने बँकेला मदत केली नाही. त्यावेळी पालकमंत्री असलेले रणजित कांबळे त्याला कारणीभूत आहेत, असा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा समज आहे. त्यामुळे रणजित कांबळे यांच्यावर नाराज अनेक नेते या निवडणुकीत काँग्रेसमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पाहत आहेत. काँग्रेसचे टोकस-कांबळे घरी बसल्याशिवाय आपले काही महत्त्व वाढणार नाही, असे मानणारे अनेक लोक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत सक्रिय आहेत. त्यामुळे तार्इंना असहकार केल्याशिवाय आपले काही राजकारण जमणार नाही, याची जाणीव झालेले राष्ट्रवादीचे नेते आता या निवडणुकीत शरीराने सोबत असले तरी मनाने ते नागपूरच्या ‘महाल’शी जोडले गेले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार चारुलता टोकस कमालीच्या अडचणीत आल्या आहेत. म्हणूनच त्यांना प्रचारासाठी आपल्या नातेवाईकांना वर्र्ध्यात पाचारण करण्याची वेळ आली आहे.
Lok Sabha Election 2019; राष्ट्रवादीच्या बंडाने काँग्रेस उमेदवाराची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:19 PM
लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अॅड. चारुलता खजानसिंग टोकस यांच्या प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. त्यांच्या प्रचारातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अंग काढून घेतले आहे.
ठळक मुद्देप्रचाराची रणधुमाळी । काँग्रेसचे सद्भावना भवन बंदच