लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अॅड. चारूलता खजानसिंग टोकस या गुडगाववरून येऊन वर्धा येथे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाबत मतदार आता थेट त्यांनाच सवाल करू लागले आहे. त्या ज्या गावाला जातात. तेथे बाई तुम्ही राहता कोठे असा प्रश्न त्यांना केला जातो. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांप्रती मतदारांचा तीव्र रोष दिसून येत आहे. याचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांची कन्या या एकाच निकषाच्या आधारे काँग्रेसने टोकस यांना उमेदवारी दिली. टोकस यांच्या प्रचारात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा भरणा असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रचंड अभाव त्यांच्या प्रचारात असून चारूलता टोकस यांचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरून उतरल्यानंतर जिल्ह्याशी फारसा संपर्क राहिला नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी परिचयही नाही. लग्नानंतर त्या गुडगाव येथे कायम राहण्यासाठी निघून गेल्या त्यानंतर दिवाळी, दसऱ्यालाच त्यांचे दर्शन कोल्हापूर राव व रोहणी गावातील नागरिकांना होते. त्या पलीकडे इतरांसाठी त्या उपलब्ध नाही. केवळ निवडणुका आल्या म्हणजे वर्धेत यायच, तिकीट मागायची असा एकसूत्री कार्यक्रम टोकस यांनी राबविला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षांपासून त्या वास्तव्याला नाहीत. त्या दिल्लीनजीकच्या गुडगाव येथे राहतात. तेथेच त्यांचा व्यवसायही आहे. ही सर्वक्षृत बाब असताना पक्षाने उमेदवारीबाबत त्याच्यावरच विश्वास टाकल्याने त्यांच्या वास्तव्याचा मुद्दा सध्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.प्रभा राव यांचे काळात जेष्ठ सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांना कायम दुखविण्याचे काम राव समर्थकाकडून झाले. तिच परंपरा त्याच्या वारसदारानेही कायम ठेवली. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यावर सहकार गटाचे लोक फोडून आपली सत्ता वाढविण्याचे काम राव समर्थकांनी केले. त्यामुळे सेलू, देवळी, वर्धा बाजार समितीवरील सहकार गटाच्या सत्तेला सुरूंग लागला. त्याचा राग प्रा. सुरेश देशमुख समर्थकांना आहे. देशमुख गटाचे राजकारण संपविण्यात राव, कांबळे हेच खरे भागीदार आहेत ही भावना दाआजींनी जपलेले शेकडो कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. त्यामुळे टोकसांच्या अडचणी वाढतील असे चिन्ह आहे. समीर देशमुख यांनी तर जाहीररित्या बंडाचे निशान उगारले आहे.काँग्रेस पक्ष अंतर्गत गटबाजीने खिळखिळा झाला आहे. विद्यमान स्थितीत वर्धा जिल्ह्यात काँग्रेसमध्ये तीन गट आहेत. यामध्ये चारुलता टोकस यांचे मावस बंधू आमदार रणजित कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिवंगत प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर शेंडे व आर्वीचे आमदार अमर काळे यांच्या गटाचा समावेश आहे. या तीनही गटातून सध्या विस्तवही जात नाही. काँग्रेस पक्षाच्यावतीने सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर वर्धा शहरात जाहीर सभा झाली. परंतु, त्या सभेनंतर ही काँग्रेस पक्षातील गटबाजी दूर झाली नाही. सभा संपताच या सभेतील आयोजनाबाबत आ. रणजित कांबळे यांच्यावर शेंडे कुटुंबियांनी थेट तोफ डागली. तेव्हापासून हे संबंध अतिशय विकोपाला गेलेले आहेत. अशा परिस्थितीत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस भाजपचा मुकाबला कसा करेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
मेघेंना काँग्रेसबाहेर काढण्यातही भूमिका४दत्ता मेघे सारख्या मोठा जनाधार असलेला नेता कॉग्रेसजवळ होता. मेघे साहेबांनी नुसती काँग्रेस वाढविली नाही तर तिचा विस्तार केला. कार्यकर्त्यांना जपले. त्या लोकनेत्याला अतिशय वेदनादायक पद्धतीने टोकस-कांबळे यांनी २०१४ च्या निवडणुकीनंतर पक्ष सोडण्यास बाध्य केले. यांची जिल्ह्यातील मेघे समर्थकांना पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच दत्ताजी मेघे यांनी जाहीर सभेत सुद्धा कार्यकर्त्यांना भाजपसोबत राहा, असे आवाहन केले आहे.