वर्धा/तळेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी तिसऱ्यांदा जिल्ह्यात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंत) येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी ३५ एकरांत मंडपाची उभारणी करण्यात आली असून, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तळेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी ४:०० वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी वर्धा शहरात सभा घेतली होती. आता तिसऱ्यांदा ते तळेगाव येथे येत आहे. सभेसाठी तळेगाव-आर्वी मार्गावरील साखर कारखाना परिसरातील चेतना ग्राउंडवर ३५ एकरांमध्ये सभामंडप उभारण्यात आला आहे. शासकीय यंत्रणेसह पोलिसांचा मोठा ताफा तळेगाव येथे दाखल झाला आहे. तळेगाव परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.विशेष पोलिस महानिरीक्षकांसह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी तळेगाव येथे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व बाजूंची चाचपणी करण्यात येत आहे. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त आहे. बंदोबस्ताकरिता अकोला, अमरावती, नागपूर येथील पोलिसांसह सुरक्षा विभागातील दोन हजार कर्मचारी दाखल झाले आहेत. नागरिकांना बसण्याकरिता जवळपास ५० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तळेगाव आगारातील वाहतूक बंद
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सभेमुळे सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून तळेगाव (श्या. पं) येथील आगारातून होणारी वाहतूक दुपारी १२:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तळेगाव आगारातून होणारी प्रवाशांची चढ-उतार आता दुसरीकडून होणार आहे. नागपूर-अमरावती जाणाऱ्या बसेस पोलिस स्टेशनसमोर प्रवाशांची चढ-उतार करतील. तसेच अमरावती-नागपूर जाणाऱ्या बसेस पोलिस स्टेशनसमोरील अप्पर वर्धा कॉलनीजवळ प्रवाशांची चढ-उत्तार करतील. आर्वी-वर्धाकडे जाणाऱ्या बसेस चिस्तूर-जळगाव-वर्धमनेरी मार्गे जाणार आहे