५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलविणाऱ्यांसह बचत खात्यात जमा करणाऱ्यांची झुंबड वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद ठरविल्यामुळे गुरुवारीही नागरिक संभ्रमावस्थेतच दिसले. बँकांचे व्यवहार गुरुवारी सुरू झाल्याने नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलविण्याकरिता व त्या बचत खात्यात जमा करण्याकरिता एकच गर्दी केली होती. नागरिकांच्या या उसळलेल्या गर्दीमुळे बँकासमोर लांबच लांब रांगा बघायला मिळत होत्या. बँकांत चार हजार रुपयांपर्यंतचे विड्रॉल देण्यात आले. तर नोटा बदल करण्याकरिता आलेल्या नागरिकांना दोन हजार रुपयेच मिळाले. नोटा बदल करताना नागरिकांकडून शासनाच्यावतीने देण्यात आलेला अर्ज भरून घेण्यात आला. बँकेतील बचत खात्यात रक्कम भरणाऱ्यांपेक्षा जवळ असलेल्या नोटा बदलविणाऱ्यांचीच गर्दी मोठ्याप्रमाणावर होती. यात पुरूषांच्या बरोबरीने महिलाही रांगेत उभ्या होत्या. ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंदच्या निर्णयाचा परिणाम बाजारात आजही होता. दुकानदाराकडून ५०० व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे दिसून आले. यामुळे सराफा, कपडा लाईन आदी ठिकाणी शुकशुकाट कायम होता. दरम्यान बँकेतून काही प्रमाणात १०० रुपयांच्या नोटा नागरिकांना मिळाल्याने चिल्लर व्यवहार सुरू झाले होते. अनेकांकडे पाचशे व हजारच्या नोटा होत्या. मात्र बँकेत गर्दी असल्यामुळे त्यांना त्या बदलता आल्या नाही. ही मंडळी चिल्लर करण्यासाठी धडपडताना दिसून आली.(प्रतिनिधी) महावितरण ११ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत स्वीकारणार जुन्या नोटा बाजारात कुठेही ५०० व १०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत नाही. दरम्यान शासनाचे आदेश आल्याने महावितरणकडूनही आता ११ नोव्हेंबर पर्यंत या जुन्या नोटा स्वीकरण्यात येणार असल्याचे कळविले आहे. यातही कंपनीने वीज बील भरण्याचा कालावधी वाढूवन दिल्याने नागरिकांना आता १५ नोव्हेंबरपर्यंत देयक अदा करता येणार आहे. शिवाय गरजेनुसार सुटीच्या दिवशीही महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. चिल्लर व्यवहाराला प्रारंभ नोटांच्या निर्णयामुळे बुधवारी शुकशुकाट असलेल्या बाजारात गुरुवारी दुपारपासून थोड्या प्रमाणात व्यवहार सुरू झाल्याचे दिसून आले. बँकेतून नोटा बदल करून मिळाल्याने चिल्लर व्यवहार सुरू झाले. नगरिकांकडून आज केवळ अत्यावश्यक वस्तुंचीच खरेदी होत असल्याचे दिसून आले. मोठ्या व्यवहारांना मात्र आजही ब्रेक असल्याचे दिसून आले. बँकांचे व्यवहार सुरू, एटीएम बंदच चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंदच्या निर्णयामुळे एक दिवस बँका बंद होत्या. बंद असलेल्या बँकांचे व्यवहार आजपासून सुरू झाले. मात्र एटीएम बंदच असल्याचे दिसून आले. आवश्यकतेच्या तुलनेत १०० रुपयांच्या नोटा कमी आहेत व बँकेत ग्राहकांची गर्दी असल्याने त्यांना नोटा पुरविणेच अवघड झाल्याने एटीएममध्ये नोटा पुरविण्यात आल्या नसल्याची माहिती आहे.
बँकांमध्ये नागरिकांच्या लांब रांगा
By admin | Published: November 11, 2016 1:43 AM