संघर्ष जाधव
केळझर (वर्धा) :विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणराज म्हणजे केळझर येथील श्री सिद्धिविनायक होय. केळझर हे गावच टेकड्यांच्या कुशीत वसल्याने निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये गणेशोत्सनिामित्त गणेश चतुर्थीपासून दहा दिवस उत्सव साजरा केला जातो. या उत्सावाकरिता विदर्भातीलच नाही तर इतरही ठिकाणच्या भक्तांची मांदियाळी असते.
केळझर हे गाव वर्धा ते नागपूर मार्गावर वर्ध्यापासून पूर्वेस २५ किलोमीटर तर नागपूरपासून ५२ किलोमीटर अंतरावर आहे. भाविकांना या देवस्थानात येण्याकरिता एसटी महामंडळाच्या बसेस, ट्रॅव्हल्स आणि ऑटोचीही सुविधा आहे. येथील वरदविनायकाची मूर्ती ४ फूट ६ इंच उंच असून तिचा व्यास १४ फुट आहे. अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक जागृत मूर्ती असल्याने येथील बाप्पा भाविकांच्या नवसाला पावणारा असल्याची सर्वत्र ख्याती आहे. टेकडीवर मंदिर परिसर असल्याने निसर्ग सौंदर्यात आणखीच भर पडली आहे.
या मंदिरात बाराही महिने भाविकांची उपस्थिती असते. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वैशाख महिन्यात जागेश्वर महाराज स्मृतीनिमित्त सप्ताह, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी उत्सव, अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव, कार्तिक महिन्यात कार्तिक मास उत्सव, पौष महिन्यात एक दिवसीय यात्रा महोत्सव, माघ महिन्यात गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सव आणि गजानन महाराज प्रगट दिन उत्सव आदी साजरे केले जातात.
ही तर ऐतिहासिक ‘एकचक्र नगरी’
वशिष्ट पुराणामध्ये व महाभारतामध्ये केळझर गावाचे नाव ‘एक चक्रनगर’ असल्याचा उल्लेख आहे. वशिष्ट पुराणाप्रमाणे श्री रामचंद्र प्रभूंचे गुरू वशिष्ट ऋषी यांचे येथे वास्तव्य असल्याची नोंद असून ऋषींनी स्वत: भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली आहे. त्यानंतर याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा देखील उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरद विनायक व वर्धा नदीचे नाव वरदा असल्याचे कळते. हा काळ श्रीराम जन्माच्या पूर्वीचा असून श्रीराम जन्मानंतर वशिष्ट ऋषींनी येथील वास्तव्य सोडले.
असा आहे येथील इतिहास
या एकचक्र नगरीत कुंतीपुत्र पांडव वास्तव्याला असताना बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याचा उल्लेख आहे. वर्धा-नागपूर मुख्य मार्गावर आग्नेय बाजूला बौद्ध विहाराच्या समोर बकासूर राक्षसाचे मैदान तोंड्या राक्षस म्हणून प्रचलित आहे. येथील टेकडीला वाकाटकच्या काळापासून भव्य किल्ल्याचे ठिकाण होते. या किल्ल्याला पाच बुरूज व माती, दगडांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाचे आत चौकोनी सुंदर व भव्य अशी कुशावरती विहीर बांधलेली असून त्याला गणेश कुंड या नावाने ओळखतात. बरेचसे भाविक या विहिरीच्या पाण्याचा तीर्थ म्हणून उपयोग करतात. वाकाटकानंतर प्रवर्शन राजाचे हे गाव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे. भोसले इतिहासाप्रमाणे भोसले राजे कोल्हापूरवरून नागपूरला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांचा केळझरला मुक्कामी राहिल्याची नोंद आहे.