कंत्राटदाराचा प्रताप : शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तालुक्यातील वायगाव नजीकच्या सरूळ टाकळी शिवारात कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना कंत्राटदार स्वत:च्या फायद्यासाठी इतर शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचे दिसते. स्वत: मोबदला घेतला असताना इतरांच्या शेतातून खोदकाम केले जात आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून कार्यवाहीची मागणी केली आहे. सरुळ-टाकळी शिवेवरील कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालव्यासाठी रंजीत इंगोले नामक शेतकऱ्याची शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यापोटील लाखो रुपयांचा मोबदलाही त्यांना शासनाकडून देण्यात आला आहे. शिवाय त्याच शेतकऱ्याने कालव्याचे कंत्राटही घेतले आहे. परिणामी, कालव्याचे काम करीत असताना मोबदला घेतला असताना स्वत:चे शेत वाचविण्याचा प्रयत्न सदर कंत्राटदार करीत आहे. चार महिन्यांपूर्वी वाल्मिक गावंडे व दीपक गावंडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची मोजणी करून घेतली असता ही बाब उघड झाली. अधिग्रहित केलेली जमीन सोडून कंत्राटदार आपल्याच शेतातून कालव्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे त्यांनी कंत्राटदाराला काम करण्यास मज्जाव केला. शेतकरी शेतात कालव्याचे काम करू देणार नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने रात्री कामाचा सपाटा लावला आहे. जेसीबीच्या साह्याने रात्री कालव्यासाठी खोदकाम केले जात असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या अन्यायाविरूद्ध शेतकऱ्यांनी देवळीच्या तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांच्याकडे तक्रार केली आहे. यात अधिग्रहित जमिनीवर कालव्याचे खोदकाम न करता कंत्राटदार समोरील शेतकऱ्याच्या शेतात खोदकाम करून १५ ते २० फुटाचे नुकसान करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मोका चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, अशी मागणी दिनेश सरोदे, सुभाष कांबळे, अनिल कांबळे, सिद्धार्थ कांबळे, वाल्मीक गावंडे, दीपक गावंडे, सतीश गावंडे, अशोक गावंडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. स्वत:ची शेती कालव्यात जात असताना आणि शासनाकडून मिळालेला मोबदलाही लाटला असताना ते शेत वाचविण्याच्या प्रयत्नात कंत्राटदार इतरांना गंडवित असून हा प्रकार अन्यायकारक ठरत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. लाभार्थ्यालाच दिले कालव्याचे कंत्राट यशोदा नदीच्या या कालव्यामध्ये सरूळ टाकळी येथील रंजीत इंगोले यांचे शेत गेले आहे. याबाबत त्यांना शासनाकडून मोबदलाही देण्यात आलेला आहे. यामुळे ते लाभार्थी ठरत आहे. वास्तविक, त्यांना वगळून इतर कंत्राटदारास कालव्याचे काम देता आले असते; पण त्याच शेतकऱ्याला कालव्याचे काम देण्यात आले आहे. यामुळे सदर शेतकरी तथा कंत्राटदार आपली शेतजमीन शाबूत ठेवत इतरांच्या शेतातून कालव्याची निर्मिती करीत असल्याचे दिसून येते. लाभार्थीच ठेकेदार झाल्याने हा प्रकार घडत आहे. दिवसा शेतकरी विरोध करतील म्हणून रात्री कामे केली जात आहेत. संबंधित अधिकाऱ्याचेही त्याला पाठबळ असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. आमची शेती गेली नसून काम करण्यापूर्वी साधे नोटीस देणे अनिवार्य होते. मात्र कुठलीही माहिती न देता रात्री काम करीत होते. ठेकेदार रंजित इंगोले स्वत:ची शेती वाचवण्यासाठी आमचे नुकसान करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी करुन आम्हाला न्याय द्यावा. - दिनेश सरोदे, नुकसानग्रस्त शेतकरी, सरुळ.
स्वत:चे शेत वाचविण्यासाठी अन्य शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Published: June 11, 2017 12:49 AM