वर्धा : नजीकच्या पवनार येथून दररोज शेकडो विद्यार्थी वर्ध्याला शिक्षणासाठी ये जा करतात. सुपर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना आॅर्डिनरी बसची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. परिणामी बरेचदा त्यांना शाळेत पोहोचायला उशीर होत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वारंवार पवनारला सुपर बसचा थांबा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. पवनार हे वर्धा नागपूर महामार्गावरील मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या १० ते १२ हजाराच्या आसपास आहे. येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज शिक्षणासाठी वर्धा आणि सेलूला जात असतात. यासाठी राज्य शासनाद्वारे बसपासची सुविधा देण्यात आल्याने विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी बसचा उपयोग करतात. या मार्गावर सुपर बसेसची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सुपर बसचा थांबा नसल्याने विद्यार्थ्यांना आॅर्डिनरी बसेसचाच वापर करावा लागतो. त्या बसेस तुलनेने कमी असल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्याची वेळे ही सकाळी सात च्या सुमारास तसेच दुपारी ११ ते १२ या दरम्यान आहे. त्यामुळे या वेळात विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त असते. पण या वेळेत तुलनेने बस कमी असल्याने बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ होते. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना चढता येत नाही. त्यामुळे पुढच्या बसची वाट पहात त्यांना ताटकळत राहावे लागते किंवा अधिकचे पैसे देऊन आॅटोने वर्धा किंवा सेलूला जावे लागते. या कारणाने आर्थिक नुकसान होते. आॅटोची तिकीट जास्त असल्याने गावातील इतरही नागरिक बसने जाण्याला प्राधान्य देतात. या कारणाने बसमध्ये आणखी गर्दी होत असते. बरेचदा आॅटोचालक बस येत असतानाच नेमके बसस्थानकावर आॅटो उभे करतात. त्यामुळे बस पकडताना धावाधाव होत असते.तसेच विद्यार्थिनींची या गर्दीत चढताना जास्त कुचंबना होते. त्यामुळे येथे सुपर बसचा थांबा देण्याची मागणी वारंवार विद्यार्थी व पालकांद्वारे केली जात आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.(शहर प्रतिनिधी)
जलद बस थांब्याविना विद्यार्थ्यांचे नुकसान
By admin | Published: October 06, 2014 11:18 PM