वर्धा : सेलू तालुक्यातील दहेगाव गो. येथे ‘अंकिता’ नामक तरुणीची चौघांनी गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर दहेगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दहेगाव पोलिसांनी ‘अंकिता’च्या मारेकऱ्यांना अटक केली असून आरोपींत दोन तरुणींचाही समावेश आहे. अंकिता सतीश बाईलबोडे (२३) रा. दहेगाव गो, असे मृत तरुणीचे नाव आहे. लक्की अनिल जगताप रा. नालवाडी, ज्ञानेश्वर महेंद्र खोब्रागडे (२४) रा. इतवारा बाजार वर्धा, अर्जुन नामक युवक, प्राप्ती लक्की जगताप (२३), आचल बादल शेंडे (२१) रा. गोरक्षण वॉर्ड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मृतक अंकिता ही वर्ध्यात ब्यूटी पार्लरचा कोर्स करीत होती. यादरम्यान तिची ओळख लक्की अनिल जगतापशी झाली होती. लक्की हा विवाहित होता, हे माहिती असतानाही मागील वर्षभरापासून मृत अंकिताचे आणि लक्कीचे प्रेमसंबंध होते. पतीच्या प्रेमसंबंधाची चुणूक लक्कीची पत्नी प्राप्ती हिला लागली. प्राप्तीने मृतक अंकिताला पती लक्कीपासून दूर जाण्यासाठी अनेकदा समजावले. मात्र, अंकिता समजण्यास तयार नव्हती. अखेर प्राप्ती हिने तिचे मित्र मैत्रीण असलेले ज्ञानेश्वर, आचल आणि अर्जुन यांना माहिती सांगितली.
चारही आरोपींनी अंकिताचे गाव दहेगाव गाठले. प्राप्ती आणि आचल यांनी अंकिताला घराबाहेर बोलाविले. अंकिता घराबाहेर आली. तिने मागे वळून तिच्या आईला आवाज दिला आणि तेवढ्यातच आरोपी प्राप्ती आणि आचल यांनी अंकिताचे केस पकडून तिला बाहेर ओढले. याचदरम्यान आरोपी ज्ञानेश्वर याने धारदार चाकूने अंकिताच्या मानेवर, पाठीवर, गळ्यावर सपासप वार करीत रक्तबंबाळ केले. सर्व आरोपी दुचाकीवरुन पळून गेले मात्र, गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन चारही आरोपींना पकडून चोप देत दहेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
रक्ताच्या थारोळ्यातील अंकिताचा सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यावर धडक दिली. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आज ३ रोजी आरोपी लक्की यालाही बेड्या ठोकल्याची माहिती दिली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि दहेगाव पोलिसांकडून सुरु आहे.
३० दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र करणार दाखल
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दहेगाव गावात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी भेट दिली. दरम्यान या प्रकरणाचा जलदगती तपास करुन ३० दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
पत्नीला प्रेमसंबंधाची चुणूक
पती लक्की आणि मृतक अंकिता या दोघांच्या प्रेमसंबंधाची चुणूक लक्कीची पत्नी प्राप्ती हिला लागली होती. प्राप्तीने या दोघांचेही फोटो लक्कीच्या ईमेल आयडीवर पाहिले होते त्यामुळे तिला विश्वास बसला आणि तिने अंकिताला संपविण्याचा कट रचून तिची निर्घृण हत्या केली.