लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यात १४९.५१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सततच्या पावसामुळे जलाशयांमधील पाणीपातळीत वाढ झाल्याने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा, सेलू तालुक्यातील बोर धरण तसेच समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन जलाशयातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात २६.६२ मिमी, सेलू तालुक्यात २८.०० मिमी, देवळी तालुक्यात १६.६०, हिंगणघाट तालुक्यात २२.०० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३८.७४ मिमी, आर्वी तालुक्यात १४.१० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३.४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ७३६५.७० मिमी पाऊस पडतो, तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात ७१२८.६७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाच दरवाजातून ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग- समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून नदीपात्रात ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सावधान : वणा नदी पात्रात होतोय पाण्याचा विसर्ग- हिंगणघाट : तालुक्यातील वडगाव या प्रकल्पाचे तीन तर नांद प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमधील नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी दिल्या आहेत. मंगळवारी सकाळी वडगाव धरणाचे तीन दरवाजे आणि नांद धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणांमधून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग थेट वणा नदीच्या पात्रात होत असून नागपूर, उमरेड भागात उसंत घेत पाऊस सुरू असल्याने या दोन्ही जलाशयात पाण्याचा वेग वाढणार आहे. हे दोन्ही जलाशय १०० टक्के भरली असून सध्या जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वणा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वणा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग- सेलू तालुक्यातील बोर प्रकल्प ९६.४७ टक्के भरला असून या प्रकल्पाचे सात दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. सध्या या जलाशयातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सेलू तालुक्यातील बोरी, हिंगणी, मोई, किन्ही, घोराड, बेलगाव, सेलू, ब्राह्मणी, कोटंबा, मडका, चानकी, कोपरा, देऊळगाव, गोहदा बुजुर्ग, आर्वी, धामणगाव, धानोली, सुकळी, जयपूर, खडका, पिंपळगाव तर समुद्रपूर तालुक्यातील आष्टा, जेजुरी, बाळापूर, देरडा, खुणी, नांद्रा, सावंगी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदी काठावरील गावांनी अशी घ्यावी काळजी...
- कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये.- नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.- मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.- जुन्या मोडकळीस आलेल्या घरात तसेच इमारतीत आश्रय घेऊ नये.- नदी किंवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास जीव मुठीत घेऊन पूल ओलांडू नये.- धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नये.- प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.