वर्धा : सहाव्या वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी विनोद भानुदास गेडाम (रा. मदनी, ता. आर्वी) यास वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ कि. टि. सूर्यवंशी यांनी दंडासह तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
न्यायाधीशांनी आरोपी विनोद गेडाम यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम ८ अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास, भादंविच्या कलम ३४२ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आठ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
सेल्फी काढून केले होते अश्लील चाळे२८ जुलै २०१७ ला प्रकृती ठिक नसल्याने पीडिता ही शाळेत गेली नाही. ती तिच्या घरी वरील मजल्यावरील खोलीत अभ्यास करीत असताना पीडितेच्या कुटुंबियांशी परिचय असल्याचा फायदा घेत आरोपी तेथे गेला. त्याने पीडितेला पिण्यासाठी पाणी मागिले. त्यानंतर आरोपीने पीडितेसोबत सेल्फी काढून तिच्याशी अश्लील चाळे केले. आरोपीच्या हाताला चावा घेत पीडितेने स्वत:ची आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका केल्यावर पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती तिच्या आजीला दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस कचेरीपर्यंत पोहोचले.सखोल तपासाअंती प्रकरण झाले न्यायप्रविष्ट
पीडितेची आई ड्युटीवरून परतल्यावर पीडितेसह तिच्या आजीने घटनेची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांना दिली. त्यानंतर तातडीने रामनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी या प्रकरणाचा सखोल तपास पूर्ण करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले.पाच साक्षदारांची तपासली साक्ष
न्यायालयात या प्रकरणाची शासकीय बाजू ॲड.विनय आर. घुडे यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून शंकर कापसे यांनी सहकार्य केले. न्यायालयात एकूण पाच साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधियांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.