अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची जुनी मागणी आहे. अनेक कॉँग्रेस नेत्यांनी आजवर या मागणीला घेऊन विदर्भात आंदोलने केलीत. परंतु, विद्यमान राजकीय स्थितीत राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना यांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून सरकार बनविण्याचे ठरविले आहे. या सरकारच्या किमान समान कार्यक्रमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वगळण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.महाराष्ट्र राज्याचे विभाजन करून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, ही मागणी महाराष्ट्रच्या निर्मितीपासून केली जात आहे. ही मागणी घेऊन कॉँग्रेस सरकारच्या काळात पक्षाच्या स्तरावर विविध ठराव घेण्यात आले. विदर्भातील अनेक कॉँग्रेस व राकॉँ नेते स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक आहेत व राज्यनिर्मितीला या दोन्ही पक्षांनी आजवर पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी विदर्भातील जनतेची इच्छा असल्यास स्वतंत्र राज्याला विरोध नसल्याचे यापूर्वीच विदर्भात अनेकदा बोलून दाखविले. भारतीय जनता पक्षानेही स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला. मात्र, स्वतंत्र विदर्भ राज्य मागील पाच वर्षांत निर्माण केले नाही. यामागे शिवसेनेचा विदर्भ राज्याला असलेला विरोध हे एक प्रमुख कारण होते. भाजप, कॉँग्रेस, राकॉँ या तीनही पक्षातील विदर्भवादी नेते स्वतंत्र राज्याची भूमिका घेऊन आहेत. आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेसोबत महाराष्ट्र विकास आघाडी निर्माण करून राज्यात सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाली आहे. त्यांनी किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. याला तीनही पक्षांनी मान्यता दिली आहे. या किमान समान कार्यक्रमात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सोडून देण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. शिवसेनेचा महाराष्ट्रच्या विभाजनाला कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे स्वाभाविकच विदर्भाला विरोध असल्याने या मागणीला कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सध्या सोडून देण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नाही. कॉँग्रेस पक्षाच्या अजेंड्यावर सध्या विदर्भ राज्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम हा महाराष्ट्रतील तेरा कोटी जनतेच्या अडचणी व प्रश्न लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नाही. सध्या शेतकरी अडचणीत आहे. त्याला आधार देण्याची गरज आहे. या बाबीवरच या किमान समान कार्यक्रमाचा केंद्रबिंदू राहणार आहे.- विजय वडेट्टीवार, आमदार तथा माजी विरोधी पक्ष नेते.