वर्धा- जिल्ह्यात दोन विधानसभा मतदार संघातच ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ मतदार संघात ४८ उमेदवार मैदानात राहिले आहे. हिंगणघाट व देवळी मतदार संघात प्रत्येकी १४ तर आर्वी व वर्धा मतदार संघात प्रत्येकी १० उमेदवार नशीब अजमावणार आहे. देवळी विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदार संघात आता १४ उमेदवार निवडणुक लढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाºयांमध्ये राजेंद्र गुलाबराव बानमारे, ज्ञानेश्वर गोविंदराव ढगे, रमेश ज्ञानेश्वर टिपले, अजय बाबाराव तिजारे, सुरेश गणपतराव नगराळे यांचा समावेश आहे. या मतदार संघात भाजपचे बंडखोर म्हणून राजेश बकाणे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे.
हिंगणघाट मतदार संघात एकूण १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ४ उमेदवारांनी रिंगणात माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदार संघात १४ उमेदवार मैदानात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राष्टÑवादी कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, लोक जागर पक्षाचे मनिष पांडुरंग नांदे, अपक्ष हेमंत इसनकर, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. या मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. वर्धा व आर्वी मतदार संघात प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात असून एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.
देवळी व हिंगणघाटमध्ये सेना-भाजपचे बंडखोर कायम
वर्धा जिल्ह्यातील देवळी व हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजप व शिवसेनेच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही. त्यामुळे येथे युतीत आता बंडखोरी झाली आहे. उलट हिंगणघाट मतदार संघात राकॉँ उमेदवाराविरूध्द बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आघाडीतील बंडखोरी शमली आहे. हिंगणघाट मतदार संघात भाजपचे उमेदवार म्हणून समीर कुणावार निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरूध्द शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने या मतदार संघात सेना-भाजप आमने-सामने येणार आहे, अशीच परिस्थिती देवळी मतदार संघात आहे. येथे शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरूध्द भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदार संघात आता भाजपचा बंडखोर मैदानात आहे. उलट शिवसेनेत अलिकडेच दाखल झालेले नाना उर्फ ज्ञानेश्वर ढगे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.