लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, विद्यमान आमदार रणजित कांबळे यांनी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना कांबळे यांच्या भगिनी व महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष अॅड. चारूलता टोकस या अनुपस्थित होत्या. त्यांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा या मतदारसंघात होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, चारूलता टोकस या गुरुवारी वर्धा जिल्ह्यातच होत्या. कॉँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उपस्थित होत्या. मात्र, शुक्रवारी बंधूंचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची गैरहजेरी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व हिमाचलच्या राज्यपाल दिवंगत प्रभा राव यांचा देवळी हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. २० वर्षे त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर या मतदारसंघातून चारूलता टोकस यांचे मावसबंधू रणजित कांबळे हे निवडून आलेत. तेही मागील २० वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. चारुलता टोकस यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत टोकस यांच्या प्रचाराच्या सुरुवातीलाच रणजितदादा आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. अशा परिस्थितीतही चारूलता टोकस यांनी निवडणुकीची धुरा आर्इंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भरवशावर सांभाळून नेली. त्यावेळीही दादांच्या गैरहजेरीची चर्चा मतदारसंघात होती. प्रभातार्इंच्या खऱ्या वारसदार मैदानात आल्यामुळे दादा व दादांचे सुभेदार नाराज झाले, असेही बोलले जात होते. या मतदारसंघात चारूलता टोकस १५ हजार मतांनी माघारल्या. गृह मतदार संघ व ४० वर्षांपासून राव, कांबळे परिवाराच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात भाजपला मिळालेले मताधिक्य हे दस्तुरखुद्द भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना धक्का देणारेच होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चारूलता टोकसच येथील उमेदवार राहतील, अशी चर्चा होती. दादांना पक्षाने उमेदवारी दिली; मात्र नामांकनाच्या मुहूर्तावरच तार्इंची गैरहजेरी सर्वांना धक्का देणारी ठरली. या मतदारसंघातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रभाताई व चारूताई यांची आठवण आज प्रकर्षाने होत असल्याचे सांगितले. निवडणुकीची रणधुमाळी आता या मतदारसंघात गृहकलहात गाजणार असे दिसत आहे.आज मुंबई येथे महिला कॉँग्रेसच्या अखिल भारतीय निरीक्षकांची बैठक होती. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या कालावधीत कोणत्या मतदार संघात प्रचाराची जबाबदारी सोपवायची यावर चर्चा होणार होती. या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे असल्यामुळे आजच्या देवळी येथील नामांकन अर्जाच्या मिरवणुकीला उपस्थित राहता आले नाही.- अॅड. चारूलता टोकस, प्रदेशाध्यक्ष, महाराष्टÑ महिला कॉँग्रेस.
Maharashtra Election 2019 ; ‘दादां’च्या नामनिर्देशनाला ‘ताई’च गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 6:00 AM
कॉँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उपस्थित होत्या. मात्र, शुक्रवारी बंधूंचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची गैरहजेरी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व हिमाचलच्या राज्यपाल दिवंगत प्रभा राव यांचा देवळी हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो.
ठळक मुद्देमतदारसंघात जोरदार चर्चा : लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार काय?