लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सोमवारी लोकशाहीतील मतोत्सव साजरा करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करुन आपल्या उमेदवाराला मताचे दान केले.विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावर्षी चांगलाच रंगलेला आहेत. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात होते. त्यांना प्रचाराकरिता मिळालेल्या बारा दिवसाच्या कालावधीत त्यांनी आपला मतदार संघ पालथा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. सोबतच हा लोकशाही उत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडावा याकरिता प्रशासन यंत्रणाही सज्ज झाली. अखेर मतदानाचा दिवस उजाडला आणि चारही मतदार संघातील एकूण १३१४ मतदार केंद्रावर सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागातील नवमतदारापासून तर वृद्ध मंडळींनीही या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होऊन आपला अधिकार बजावला. बऱ्याचश्या भागामध्ये संथगतीने मतदानाची प्रक्रिया पार पडल्याने पहिल्या टप्प्यातील मतदान हे कमीच होते.दुपारनंतर मतदारांची ठिकठिकाणी गर्दी उसळली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची दाट शक्यता होती. परंतु निसर्गानेही या उत्सावाकरिता साथ दिल्याने सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले.लोकप्रतिनिधींनीही रांगे उभे राहूनच केले मतदानमतदानाचा अधिकार हा सर्वांनाच सारखा असलेल्या हा अधिकार बजावताना लोकप्रतिनिंधीसह मोठ्या अधिकाऱ्यांनाही सारखाच न्याय दिल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदारांसह माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यासह विधानसभा निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार यांनीही आपापल्या मतदार संघातील मतदान केंद्रावर हजेरी लावली. त्या ठिकाणी मतदानाक रिता असलेल्या मतदारांच्या रांगेत उभे राहूनच आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे सर्वसामान्य मतदार राजांनाही त्यांना एका मतदानाचे महत्त्व कळाले.नवमतदारांमध्येही मतदानाचा संचारला होता जोशजिल्ह्याच्या आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा या चारही मतदार संघात १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १८ हजार ८३ मतदार आहे. यातील काही मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणारे असल्याने त्यांच्यामध्ये आज जोश दिसून आला. आपल पहिल मतदान हे वाया जाता कामा नये म्हणून अनेकांनी विचारपूर्वक मतदान केले. त्यानंतर सेल्फी काढून ‘मी केले प्रथम मतदान...’ असे व्हाट्स अॅपवर स्टेटसही ठेवले आहे. यासोबत मतदानाचा टक्का वाढीच्या दृष्टीने आणि मतदानाचे महत्व इतरांना कळावे म्हणून सोशल मिडीयावर मतदान करण्याचे आणि मतदान केल्याचे अनेक संदेश झळकताना दिसून आले. त्यामुळे आज सोशल मिडीयाही या मतोत्सवात हाऊसफुल्ल झाला होता.
मतदान केंद्रावर सोईसुविधांचा अभाव, स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्यविधानसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांची संख्या लोकसभा निवडणुकीपासून दुप्पट करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत,लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांकरिता वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन, रॅम्पची व्यवस्था,पिण्याचे पाणी,विजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहाची सुविधा व्यवस्था करण्यात करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाचे त्याची अंमलबजावणी केली परंतु ग्रामीण भागात काही ठिकाणी या सुविधांचा अभाव होता. वर्ध्यातील राष्ट्रभाषा येथील मतदान केंद्रावर अपंगाकरिता व्हीलचेअर नसल्याची ओरड मतदारांकडून करण्यात आली. विशेषत: प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवकांनी आपले मोलाचे कर्तव्य बजावले.