लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान आणि कार्याची दखल जगातील विचारवंतानी घेतली आहे. सत्य, शांती व अहिंसेच्या माध्यमातून जगात क्रांती घडून आली. यासाठी सत्याग्रह आणि असयोग आंदोलन उभारले. युवा कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्त्व पूर्ण प्रसंग साकारित असून गांधी जयंतीला गांधी प्रेमीसाठी ही अपूर्व भेट राहणार आहे.सन २०१८-१९ हे वर्ष गांधीजींचे सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त देश विदेशात विविध कार्यक्रम होणार आहेत. काही ठिकाणी त्याची सुरूवातही झाली आहे. २ आॅक्टोबरला सेवाग्राम आश्रमात मोठ्या संख्येने राजकीय नेते, पर्यटक आणि गांधी विचारांना मानणारा वर्ग नतमस्तक होण्यासाठी येणार आहे. कला एकावेळी लाखो लोकांशी संवाद साधीत असते. त्यामुळे दक्षिण मध्यवर्ती सांस्कृतिक मंडळ नागपूर ने मुंबईतील युवा कलाकारांच्या माध्यमातून अपूर्व रांगोळी भेट घडवून आणली आहे. गुरूवार पासून यात्री निवासच्या सभागृहात रांगोळी कलाकृतीला सुरूवात झाली आहे. यात गांधीजींच्या दक्षिण आफ्रिका, भारतातील सत्याग्रह, प्रमुख नेत्यांशी वातार्लाप आदी प्रसंग आणि जीवन शैली साकारणार आहेत. ही रांगोळी प्रदर्शनी सर्वसामान्य नागरिकांना २ आॅक्टोबरला बघता येणार आहे.
मुंबईचे कलावंत सेवाग्रामातएकापेक्षा एक अशी आकर्षक व बोलकी रांगोळी रेखाटण्यासाठी मुंबई येथील सहा कलावंत सेवाग्राम येथे दाखल झाले आहेत. यात समीर पेंढूरकर, कल्पेश भोईर, उदय डावल, सिद्धेश भोगले, पंकज मिस्त्री, शुभदा कासले यांचा समावेश आहे. त्यांनी दिल्ली, मुंबई, बनारस, चंदिगढ, छत्तीसगड आदी ठिकाणी रांगोळीतून अनेक कलाकृती साकारल्या आहेत. स्कील इंडियामध्ये देशाचे प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रम प्रसंगी कलाकृती त्यांनी साकारली होती, हे विशेष.रांगोळी हा प्रकार भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा आहे. पारंपारिक ठिपक्यांच्या रांगोळीने संस्कार भारती आणि आता कालाक्रुतीने जागा घेतली. आम्ही याला चांगले डेव्हलप केल्याने आमच्या कलाकृतीला संधी मिळाली. राष्ट्रीयस्तरावर आम्ही मिळून काम करीत आहोत. ही संधी दक्षिण मध्यवर्ती सांस्कृतिक मंडळ नागपूरने दिली आहे. सेवाग्राम आश्रमात बापू व प्रसंग साकारणे आमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.- कल्पेश भोईर.