वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाचे कुलगुरू प्राे. रजनीशकुमार शक्ल यांच्या विरोधात बुधवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन गुरुवारी १० रोजीही सुरूच होते. कुलगुरू शुक्ल यांना कक्षातून बाहेर पडताना पोलिसांच्या सुरक्षेची मदत घ्यावी लागली. विद्यापीठाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
जनसंवाद विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. धर्वेश कथेरिया यांचे निलंबन मागे घ्या, नैतिकतेच्या आधारावर कुलगुरूपदाचा राजीनामा द्या, अशी मागणी आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी रेटून धरत घोषणा दिल्या. विद्यापीठ स्थापनेनंतर आंदोलनाची ही पहिलीच वेळ असून दोन दिवसांपासून विद्यापीठ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. मागील दीड वर्षांपासून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप करण्यात आले आहे. विद्यापीठाला कलंकित करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकारी विद्यार्थ्यांची आहे. मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलावी, जर वरिष्ठ अधिकारी असे करु शकत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे. गुरुवारीही कुलगुरू शुक्ल कक्षातून बाहेर पडतेवेळी विद्यार्थ्यांनी घेराव घालून विरोधात घोषणा दिल्या. त्यांना पोलिस बंदोबस्तात त्यांच्या कारपर्यंत सोडून विद्यापीठाबाहेर पाठविण्यात आले.
डॉ. कथेरियांसोबत एसपींची चर्चा
डॉ. धर्वेश कथेरिया यांना पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलाविले होते. कथेरिया यांनी भेट घेतली असता त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केल्याचे कथेरिया यांनी सांगितले.
आंदोलन सुरूच राहणार..
आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही रात्रभर कुलगुरूंच्या कक्षाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलनावर बसले होते. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, गुरुवारी दुसऱ्या दिवशीही गांधी हिलवरील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थी आंदोलनावर बसले असल्याचे दिसून आले.