सेवाग्राम (वर्धा) - 21 सप्टेंबर हा जगात विश्व शांती दिवस म्हणून पाळला जातो. गांधीजी आणि डॉ नेल्सन मंडेला यांनीही प्रेम, अहिंसा आणि शांतीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. जगाला आज शांतीचीच गरज असल्याचे दिसून येत आहे. यंदा गांधीजींची 149 वी जयंती साजरी होणार असून 2019 मध्ये बापूंची 150 वी जयंती आहे. तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने शुक्रवारी पुण्याच्या बाणेर येथील शिवकृपा येथून या शांती पदयात्रेला सुरूवात झाली.
पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा श्रीमंत दगडू शेट गणपती मंदिर, संत साधूवासवाणी मिशन आणि पाषाण येथे रात्रीला मुक्कामी अशी 29 किमीची पदयात्रा केली. यात्रेत योगेश माथुरिया, दिलीप ताँबोळकर, सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमचे जालंधरनाथ चन्नोळे, संग्राम पाटील आणि साक्षी माथुरिया सहभागी आहेत. यांच्यासोबत पुण्यातील समविचारी लोकं पुण्यापर्यंत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात योगेश माथुरिया हे 60 तर सर्वात लहान साक्षी माथुरिया ही 19 वर्षांची तरूणी पदयात्रेत सहभागी आहे. हा यात्रा प्रवास तळेगांव, लोणावळा, खालपूर, पनवेल, वाशी तर 28 रोजी घाटकोपर, मुंबई असा प्रवास करुन दिवसांत 30 ते 35 किमी अंतर पायी चालणार आहे. 29 रोजी पदयात्री दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होतील आणि गांधी जयंतीदिनी दक्षिण आफ्रिकेतील जोहानिश बर्ग येथील फिनिक्स आश्रमातून गांधी-नेल्सन मंडेला शांती पदयात्रेला सुरूवात होईल.