लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगभरातील साहित्य, कला आणि विविध माध्यमांवर महात्मा गांधी यांनी आपला ठसा उमटविला आहे. जनमानसावर अधिराज्य गाजविणारा हा महात्मा सर्वांनाच आपलासा वाटतो. कारण गांधींचे राजकारण हे प्रेमाचे होते, ते द्वेषमूलक नव्हते, असे प्रतिपादन म्युझियम आॅफ गोवाचे संस्थापक डॉ. सुबोध केरकर यांनी केले. ते दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात गांधी १५० निमित्त आयोजित ‘महात्मा गांधी एक कलाविष्कार’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर कुलगुरू डॉ. ए. जे. अंजनकर, डॉ. श्याम भुतडा, डॉ. अभय मुडे, डॉ. अथरूद्दीन काझी, डॉ. सीमा सिंग, प्रा. इंदू अलवटकर, संजय इंगळे तिगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या व्याख्यानात सुबोध केरकर यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनव्दारे जगभरातील कलाक्षेत्रावर असलेल्या गांधींच्या प्रभावाची सचित्र मांडणी केली. विविध देशातील मोठमोठ्या कंपन्यांना आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना आजही गांधींचे चित्र, व्यंगचित्र, चलचित्र आणि विधानांचा वापर करावासा वाटतो. त्यामुळे फ्रान्सच्या सुगंधी अत्तर बनविणाऱ्या जगविख्यात कंपनीपासून तर अमेरिकेतल्या बियर निर्मात्यांना आणि फास्ट फूड विक्रेत्यांनाही गांधी त्यांच्या ब्रँडवर हवा असतो. कोलंबिया सरकारला नागरिकांना पायी चालण्याचा संदेश देताना फूटपाथवर गांधीजीच चित्रं लावाविशी वाटतात. इटालियन टेलिकॉम कंपनी आपली संवादयंत्रणा सर्वश्रेष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी गांधीची मदत घेते. ब्रिटीश पेन कंपनी पेनाच्या नीबवर गांधींचे चित्र कोरते. गांधी केवळ भारतातल्या देवदेवतांच्या चित्ररूपात दिसत नाही तर पाश्चातांच्या सुपरहिरोंमध्ये गांधींना प्राधान्य आहे. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटात आणि कार्टून फिल्ममध्येही गांधी झळकतो आणि अनेक पॉप गायकांच्या गाण्यांतूनही तो व्यक्त होत राहतो. पाश्चात्य व्यंगचित्रकारांपासून तर नंदलाल बोस, आर. के. लक्ष्मण आणि राज ठाकरे यांच्या पर्यंत अनेकांना व्यंगचित्रातून संदेश देण्यासाठी गांधी हेच माध्यम उपयुक्त वाटते. जगभरात सर्वाधिक पुस्तके आणि व्यंगचित्रे ही गांधीवरची आहेत. जगभरातील अनेक मुख्य रस्त्यांना गांधीचेच नाव आहे. गांधींचा प्रभाव स्वातंत्र्यपूर्व काळातही इतका होता की १९४६ मध्ये ब्रिटीश सरकारने गांधी ट्रेन सुरू केली होती. तर १९४८ साली लालबागचा राजा मंडळाने महात्म्याला आदरांजली वाहण्यासाठी गणेशाची मूर्ती गांधीरूपात साकारली होती, अशी रंजक माहिती या व्याख्यानात सुबोध केरकर यांनी दिली. त्यांच्या संग्रहातील अनेकानेक दुर्मिळ छायाचित्रांना, चलचित्रांना, पाश्चात्य गाण्यांना, गांधीच्या वैद्यकीय अहवालाला आणि केरकरांनी केलेल्या वर्तमानकालीन राजकारणावरील टिपणीलाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली. धर्म हा खाजगी असू शकतो; पण खरा धर्म मानवताच आहे, असे म्हणणारे महात्मा गांधी अंधश्रद्धांना विरोध करणारे आणि आपल्या व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करीत प्रयोगशीलता जोपासणारे होते, अशी माहिती सुबोध केरकर यांनी दिली. गांधीविषयक विविध वस्तूंचा आणि दस्तावेजांचा संग्रह करणाºया डॉ. केरकरांनी यावेळी स्वनिर्मित गांधी अॅपचे प्रात्यक्षिकही दिले. गांधी अॅप मोबाईलमध्ये असल्यास जगभरातील कोणत्याही चलनासमोर आपल्या मोबाईल फोनचा कॅमेरा धरला असता गांधींचे चित्र फोनच्या स्क्रीनवर येत असल्याचे त्यांनी दाखविले. व्याख्यानाला शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा गांधी यांचे राजकारण प्रेमाचे, द्वेषाचे नव्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:03 PM
जगभरातील साहित्य, कला आणि विविध माध्यमांवर महात्मा गांधी यांनी आपला ठसा उमटविला आहे. जनमानसावर अधिराज्य गाजविणारा हा महात्मा सर्वांनाच आपलासा वाटतो. कारण गांधींचे राजकारण हे प्रेमाचे होते, ते द्वेषमूलक नव्हते, असे प्रतिपादन म्युझियम आॅफ गोवाचे संस्थापक डॉ. सुबोध केरकर यांनी केले.
ठळक मुद्देसुबोध केरकर : ‘महात्मा गांधी एक कलाविष्कार’ विषयावर विशेष व्याख्यान