लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून त्याची अंमबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली असली, तरी अजूनही ५८ तक्रारी प्रलंबित आहेत.महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांची कर्ज खाते बँकांकडून अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ हजार ८४४ कर्जबाजारी शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ५३ हजार ६७३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. तर याच योजनेसंदर्भात २ हजार २०५ तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यापैकी २ हजार १४७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून सध्या स्थितीत ५८ तक्रारी प्रलंबित आहेत. यातील १३ तक्रारी जिल्हा पातळीवर, तर ४५ तक्रारी तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. या तक्रारींचाही वेळीच निपटारा होणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे.
३,९८२ शेतकऱ्यांचे काय?योजना जाहीर होताच जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांचे कर्ज खाते बँकांनी अपलोड केले. त्यानंतर ५४,८४४ खाते योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. आतापर्यंत आधारप्रमाणीत केलेल्या ५३,६७३ पैकी ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला. पण बँकांनी अपलोड केलेल्या उर्वरित ३,९८२ शेतकऱ्यांचे पुढे काय? हा प्रश्न कायम आहे.
काय म्हणतात शेतकरी
युती सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या तुलनेत महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना पारदर्शी आहे. ही योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे.- नंदराज वैद्य, शेतकरी.
शासनाने कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे. कारण खत, बियाणे आदींचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा वेळी हमीभाव हा शेतकऱ्यांना दिलासाच देईल.- दिवाकर महाजन, शेतकरी.
२,२०५ शेतकऱ्यांच्या तक्रारी
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेशी संदर्भात जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या आतापर्यंत २ हजार २०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ८६८ तक्रारींचा निपटारा जिल्हा पातळीवर, तर १ हजार २७९ तक्रारींचा निपटारा तालुकास्तरावर करण्यात आला आहे.
५२,७२६ शेतकऱ्यांना मिळाले ४६५.७७ कोटी- महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण केलेल्या ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.