राकाँची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश वितरीत करण्यात येतो. यासाठी शासनाचे जिल्हास्तरावर अनुदान येत असते; मात्र यावर्षी शैक्षणिक सत्र सुरू होवून सुद्धा अद्यापपर्यंत जिल्हास्तरावर अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश पासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन गणवेश वितरण प्रणाली मध्ये बदल करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना केली आहे. गणवेश अनुदान १.४४ कोटी त्वरीत उपलब्ध करून द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे. रायुकॉ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात २७ जूनपासून सन २०१७-१८ चे शैक्षणिक सत्र सुरू झाले. मात्र गणवेश अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झाले नाही. त्यामुळे जुन्या गणवेश परिधान करुनच विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. शिवाय वितरण प्रणाली मध्ये असलेले निकष बदलणे गरजेचे आहे. यामध्ये एका पालकाचे दोन अपत्ये असल्यास दोन स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे तसेच सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालकांसमवेत संयुक्त खाते प्राप्त झाल्याशिवाय अनुदान वितरण करु नये असे निर्देश आहेत. ग्रामीण क्षेत्रातील अनेक बँका झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास तयार नाही. ही कार्यप्रणाली वेळखाऊ असून पालकांना त्रासदायक आहे. त्यामुळे त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. याशिवाय जिल्हास्तरावर लाभार्थी संख्येच्या प्रमाणात सरळ अनुदान मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करावी मुख्याध्यापकांनी लाभार्थी विद्यार्थ्यांचे, पालकांचे जे खाते अस्तीत्वात असतील त्या खात्यावर जमा करावे. प्रत्येक योजनेकरिता स्वतंत्र खात्याचा आग्रह धरू नये. मुख्याध्यापकांनी सरसकट २०० रुपये प्रमाणे अनुदान खात्यावर जमा केल्यानंतर पालकांनी गणवेश खरेदी करण्याकरिता पाठपुरावा करावा. गणवेश वितरण प्रणाली मध्ये असलेले निकष बदलवून विद्यार्थ्यांना, पालकांंना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रा. खलील खतीब, संदीप किटे, अंबादास, वानखेडे, डॉ. किशोर अहेर, अब्दुल गणी, विनोद पांडे, राहुल घोडे, अमीत लुंगे, संदीप पाटील, सागर मरघडे, संदीप धुडे, विनय मुन, सुयोग बिरे, संकेत निस्ताणे, डॉ. कोल्हे यांच्या राकॉचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गणवेश अनुदान वितरण प्रणालीत बदल करा
By admin | Published: June 29, 2017 12:33 AM