पवनार : जिल्ह्यातील बहुतांश गणेश मुर्तींचे व दूर्गा मुर्तींचे विसर्जन धाम नदीत केले जाते. सार्वजनिक व घरगुती गणपतींची विसर्जनामुळे जलप्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास होतांना दिसतो. यामुळे येथे विसर्जनाकरिता येत असलेल्या गणेश मंडळावर कर लावावा अशी मागणी पवनार येथील सरपंच अजय गांडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात पवनार येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेत तसा ठराव घेण्यात आल्याची माहिती गांडोळे यांनी दिली. नदीच्या पात्रात विसर्जनकरिता येत असलेल्या प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मुर्तींचे पाण्यात विघटन होत नाही व त्यावरील रंगामुळे नदीपात्रात मोठ्या प्रताणात रसायने मिसळली जातात. अशा रसायनयुक्त पाण्याचे पूर्णत: शुद्धीकरण होत नसल्यामुळे ते कालांतराने नागरिकांच्या पोटात जाऊन दुर्धर आजार बळावतात. मुर्तींच्या विसर्जनामुळे नदी पात्रातील राहिलेल्या मुर्तींचे अवशेष बाहेर काढणे, मुर्तींसाठी वापरण्यात येणारी तणसं व इतर साहित्य बाहेर काढण्यासाठी जो खर्च येतो तो. ग्रा.पं. प्रशासनाच्या आवाक्याबाहेरचा आहे. यामुळे सामाजिक संघटनाकडून मिळालेल्या मदतीच्या भरवश्यावर गत दोन वर्षांपासून नदीपात्राची साफसफाई करण्यात येत आहे; परंतु निधीच्या कमतरतेमुळे पुर्णत: पात्र साफ होत नाही व त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. जिल्हा प्रशासन ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचे सांगून मोकळी होतात. मंडळाच्यावतीने उत्सवावर हजारो रुपये खर्च केले जातात. तेव्हा नदीघाटावर विसर्जन व्यवस्थेसाठी व स्वच्छतेकरिता कर रूपात १००० रुपये प्रत्येक मंडळाने ग्रामपंचायत प्रशासनाला देऊन नमुना ७ ची पावती घेतल्यास नदी स्वच्छता मोहिमेस पाठबळ मिळेल. या कराची आकारणी संदर्भात आमसभेच्या ठरावानुसार जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली. जर कराची आकारणी करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली तर हा संपूर्ण निधी स्वच्छता मोहिमेसाठी वापरण्याची ग्वाही सरपंच अजय गांडोळे यांनी दिली.(वार्ताहर)
गणेशोत्सव मंडळावर पर्यावरण कर लावा!
By admin | Published: August 31, 2016 1:05 AM