वर्धा : पोलिसांच्या तपासावरच आरोपीची शिक्षा वा त्याची निर्दोष मुक्तता आधारित असते. यामुळे गुन्ह्यांचा तपास करताना तो खोलवर करा. गुन्ह्याच्या मुळाशी जात सत्यता शोधून काढत आरोपीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, या दृष्टीने तपास करण्याच्या सूचना नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी शुक्रवारी वर्धा पोलिसांना दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नव्या कार्यालयात झालेल्या जिल्ह्याच्या क्राईम मिटींगमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या गुन्ह्याचा आढावा घेतला. यात जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्याच्या डिटेक्शनमध्ये जिल्हा माघारात असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यावरूनच त्यांनी जिल्हा पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्याची चर्चा पोलीस विभागात आहे. शिवाय गुन्ह्याचा तपास करताना पोलीस विभागाच्यावतीने विशेष परिश्रम घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एटीएम चोरीचा छडा लावण्यात वर्धा पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुकही केल्याची माहिती आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना त्यात आरोपीला दोषसिद्धी होणे महत्त्वाचे आहे. तपास करताना पहिले याचाच विचार पोलिसांनी करावा. याकडे पोलिसांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांच्याकडून करण्यात आल्या. सोबतच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आॅनलाईन क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात एटीएमचा पासवर्ड विचारून त्यातून रक्कम लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी नागरिकांना सावध करणे ही पोलिसांची जबादारी असून याकरिता जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. यावर पोलीस अधीक्षकांनी तशी जनजागृती वर्धेत सुरू असल्याचे सांगितले. सभेनंतर पोलीस मुख्यालयात झालेल्या परेडची पाहणी करून ते नागपूरकडे रवाना झाले. सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार उपस्थित होते.(प्रतिनिधी)
गुन्ह्याचा तपास खोलवर करा
By admin | Published: March 12, 2016 2:31 AM