दर्जेदार विकास कामे करा; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:50 PM2018-10-24T23:50:23+5:302018-10-24T23:50:53+5:30
शहराच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून विविध विकास कामे सुरु असून ती सदोष आहेत. त्यामुळे दर्जेदार व मानकानुसार कामे करण्यात यावी; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु असा इशारा शहर काँग्रेसच्यावतीने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहराच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून विविध विकास कामे सुरु असून ती सदोष आहेत. त्यामुळे दर्जेदार व मानकानुसार कामे करण्यात यावी; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु असा इशारा शहर काँग्रेसच्यावतीने दिला आहे. याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाºयांना निवेदनही दिले.
स्थानिक नगर पालिकेत भाजपाची सत्ता असून विकासासाठी पालिकेला कोट्यवधीचा निधी मिळाला आहे. ‘सुंंदर व स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत शहरातील गल्लीबोळातून भूमिगत नाल्या, रस्ते व पेवींग ब्लॉकची कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ठ दर्जाची व दिलेल्या मानकानुसार होत आहे.
शहराच्या विविध भागातील गल्लीबोळात झालेले अतिक्रमण, त्यामुळे साफ न होणाºया नाल्या तसेच निमुळत्या गल्लीबोळात जुन्या नाल्या फोडून भूमिगत नाल्याची कामे मोठ्या प्रमाणवर सुरू आहेत. या नाल्यात सिमेंटचे पाईप टाकताना सिमेंट कॉक्रीटिंग करणे गरजेचे आहे. शिवाय गल्लीबोळात पेवींग ब्लॉक बसवितांना सुध्दा कॉक्रीट ऐवजी माती व मुरुमाचा वापर करण्यात येत आहे. ही कामे अनुभवहिन कंत्राटदाराकडून होत असून ही कामे निकृष्ठ दर्जाची होत आहे. या प्रकरणी त्वरीत प्रशासनाने लक्ष द्यावे व कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी काँग्रेसने निवेदनातून केली आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष रमेश सावरकर, महासचिव अश्विन शाह, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मुन्ना सिद्धीकी, जिल्हाध्यक्ष शब्बीर खॉ.पठाण, सुनील ब्राम्हणकर, बाबा अब्दुल जलील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.