अंमलबजावणी सुरू : सामाजिक न्याय मंत्रालयाचा उपक्रमखरांगणा (मोरांगणा) : ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे प्रदान करण्यात आलेल्या सोईसवलतीचा व अधिकारांचा त्यांना फायदा मिळणे कठीण झाले आहे. हाच लाभ त्यांना मिळावा या हतूने समाज कल्याण खात्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र बनविण्याचा कार्यक्रम ग्रा.पं. स्तरवर राबविण्यात येत आहे.ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेले हे ओळखपत्र तयार करण्यात येत असल्याची कुठलीही माहिती त्यांना नसल्याचे समोर आले आहे. शासनाने तब्बल १२ वर्षानंतर हे ओळखपत्र तयार करण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. या मागचे नेमके कारण काय याचा उलगडा होऊ शकला नाही. २००३ मध्ये घेतलेल्या निर्णयाची आता अंमलबजावणी होत असल्याने तब्बल १२ वर्षे ज्येष्ठांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागले. यातील अर्ध्या सुविधा मिळत असल्या तरी इतर सुविधा त्यांच्याकरिता आहे याची माहितीही त्यांना नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तालुकास्तरावरील ग्रामीण भागात डिग्निटी फाऊंडेशनकडे ओळखपत्राचा मसुदा भरून घेण्याचे काम दिले आहे. अर्ज भरल्यानंतर दोन महिन्यात तयार करून ते वितरित करण्यात येणार आहे. त्यात काही चूक असल्यास पाच दिवसांच्या आत ती दुरूस्त करण्यात येईल, अशा सूचना शासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.(वार्ताहर)ओळखपत्रावर मिळणाऱ्या सुविधाओळखपत्र बाळगणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात ४० ते ५० टक्के सवलत, म.रा. परिवहन मंडळाच्या बस भाड्यात ५० टक्के, हवाई प्रवासातील मूळ भाड्यात ५० टक्के, निवडक खासगी रुग्णालयात ३० टक्के व शासकीय रुग्णालयात मोफत सेवा, बँक ठेवीमध्ये ०.५ टक्के अधिक व्याज सवलत, टपाल विभागातील बचत योजनेवर ९ टक्के व्याजदर, उच्च न्यायालयातील सुनावणीत प्राधान्य, महाराष्ट्रातील निवडक व्यवसाय करात १०० टक्के सुट, एम.टी.एन.एल. सेवेतील मासिक शुल्कात २५ टक्के रेल्वे व बसेस मध्ये आरक्षित आसन सुविधा, वृद्धाश्रमात मोफत किंवा अल्पदरात प्रवेश व्यवस्था आदी फायदे ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. आवश्यक कागदपत्र ओळखपत्राकरिता वयाचा दाखला (जन्माचा दाखला नसल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दाखला), मतदार ओळखपत्र, आधारकार्ड प्रत, रहिवासी दाखला, वैद्यकीय माहिती असलेले प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे चार फोटो, नावाचा पुरावा, ही कागदपत्रे आवश्यक असून महाराष्ट्र शासनाचे शुल्क ५० रुपये व सभासद शुल्क ५० रुपये खर्चाची आकारणी करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र बनवा, अधिकार मिळवा
By admin | Published: April 06, 2015 2:05 AM