वर्धा : सर्दी, खोकला, तापसारख्या आजारांवर आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्यांचे सेवन करतो. त्यातल्यात्यात पॅरासिटामॉल ही गोळी सर्वात जास्त खाल्ली जाते. परंतु, असे करणे घातक ठरू शकते. पॅरासिटामॉल गोळीचा ओव्हरडोस झाल्याने युवकाचा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतल्याची माहिती दिली.
रजत राजपाल मेंढे (वय २७, रा. देवळी ह.मु. शिवाजी चौक, वर्धा) असे मृत युवकाचे नाव आहे. तो एका खासगी फायनान्स कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. २९ जानेवारी रोजी रात्री तो कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. ३० जानेवारीला सकाळी त्याने वडिलांना भ्रमणध्वनीवरून प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. प्रकृती बिघडल्याने त्याला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ ३० जानेवारी २०२२ रोजी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे उत्तर दिले.
रजतचा ९ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रजतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचा अहवाल प्राप्त झाला असता अहवालात पॅरासिटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी नोंद घेतल्याची माहिती दिली.