वर्धा :न्यायालय परिसरात चक्क आराेपीने साक्षिदार असलेल्या महिला विकलावर चाकूहल्ला केल्याच्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यापार्श्वभूमीवर न्यायालय परिसरातील नवीन इमारतीत डोअर फ्रेम डिटेक्टर लावण्यात आले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास पुन्हा न्यायालयात येणाऱ्या एका युवकाकडे चायनीज चाकू मिळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी आरोपीस शहर पोलिसांनीअटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रज्वल दिनेश पाजारे रा. आनंदनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
२२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास न्यायालय परिसरात आरोपी भीमा गोविंद पाटील याने साक्षीदार असलेल्या महिला वकिल योगिता मुन यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेने न्यायालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात प्रवेशद्वारावर डोअर फ्रेम डिटेक्टर लावण्यात आले. येथे पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले. बुधवारी दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरू असताना काही युवक नवीन इमारतीत प्रवेश करीत असतानाच डिटेक्टरला पाहून आरोपी प्रज्वल दिनेश पाजारे याने पळ काढला. दरम्यान तैनात कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून त्याची पाहणी केली असता त्याच्याजवळ चायनीज चाकू मिळून आला. लगेचच याची माहिती शहर पोलिसांना दिली असता पोलिसांनी न्यायालयात धाव घेत आरोपी प्रज्वल पाजारे याला अटक करुन चाकू जप्त केला.
बुधवारी न्यायालयीन कामकाज ठेवले वकिलांनी बंद
२३ मार्च बुधवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हा वकिल संघाच्या जुन्या बार रुममध्ये सभा घेण्यात आली. सभेत वकिल योगिता मुन यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करुन वकिल संघातील सर्व सभासदांनी बुधवारी न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा आदेश सर्वानुमते पारित केला. यामुळे आज न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले होते.
आरोपीचे वकिलपत्र न घेण्याचा ठराव मंजूर
२२ रोजी महिला वकिल योगिता मुन यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध व्यक्त करुन आरोपी भीमा गोविंद पाटील याचे कुणीही वकिलपत्र न घेण्यासाठी तातडीने सभा घेण्यात आली. आयोजित सभेत कोणत्याही वकिलाने आरोपीचे वकिलपत्र घेऊ नये, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.