वर्धा : रेल्वेचा प्रवास करून नियोजित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजा पोहोचविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेल्या धडक कारवाईअंती पुढे आला आहे. वर्धा रेल्वे स्थानकावर मध्यरात्री केलेल्या या कारवाईदरम्यान ओडिसा राज्यातील रहिवासी असलेल्या भाग्य मलिक वल्द सुनेना मलिक (२९) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ८० हजार रुपये किमतीचा ७.९८२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी काही संशयित व्यक्तींच्या जवळील साहित्याची पाहणी केली. वर्धा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर संशयितांच्या जवळील साहित्याची पाहणी सुरू असताना एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी भाग्य मलिक वल्द सुनेना मलिक याला ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी प्रकरण वर्धा लोहमार्ग पोलिसांकडे वळते केले. या कारवाईत आरोपीकडून ७.९८२ किलो गांजासह एकूण ८४ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लोहमार्ग पोलिस घेत आहेत तस्करीबाबत अधिकची माहिती
ओडिसा राज्यातील भाग्य मलिक या तरुणाजवळ मोठ्या प्रमाणात गांजा आला कुठून. तो त्याने कुणाकडून व कुठे खरेदी केला. शिवाय तो हा गांजा कुणाला आणि कुठे देणार होता, यासह विविध बाबींची माहिती सध्या वर्धा लोहमार्ग पोलिस घेत आहेत. असे असले तरी रेल्वेचा प्रवास करून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याचे या कारवाईमुळे पुढे आले आहे.