वर्धा : सासऱ्याच्या पाच एकर शेतीचा वाद विकोपाला गेल्याने सख्ख्या साडभावाची दारूच्या बाटलीत विषप्रयोग करून निष्ठूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील जुनगड गावात शुक्रवारी उघडकीस आली होती. पोलिसांनी मुख्य आरोपीसह जडीबुटी विक्रेत्या दोघांना अटक केली होती. तिघांनाही २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांनी या विक्रेत्याकडून ५० हजारांत विष विकत घेऊन इंजेक्शनच्या साहाय्याने बाटलीत ‘इन्जेक्ट’ केल्याचा खुलासा पोलिसांसमोर केला आहे.
मृतक मोरेश्वर पिंपळे आणि आरोपी संदीप पिंपळे हे दोघेही सख्खे साडभाऊ आहेत. त्यांच्यात सासऱ्याच्या जुनगड येथील पाच एकर शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीतून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेला. गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त जुनगड येथे आलेल्या आरोपी संदीपने दारूच्या बाटलीत विषप्रयोग करून ती दारू मोरेश्वरला पिण्यास दिली. मोरेश्वरने दारू पिताच त्याचा मृत्यू झाला. सेलू पोलिसांनी हे हत्याकांड उघडकीस आणले. मुख्य आरोपी संदीप पिंपळे आणि त्याला विष देणारे विजयसिंह डिड्डसिंह चितोडिया (वय ४१, रा. चंद्रपूर ह. मु. अमरावती) आणि राजकुमार मानसिंग चितोडिया (रा. सावरखेेड, जि. अमरावती) यांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस कोठडीदरम्यान आरोपी संदीप याने विजयसिंह चितोडिया याच्याकडून ५० हजारांत विष विकत घेतल्याची माहिती दिली. इंजेक्शन वापरून दारूच्या बाटलीच्या झाकणातून विष ‘इंजेक्ट’ केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
वर्धा बसस्थानक परिसरात झाली ‘डिल’
आरोपी संदीप पिंपळे आणि जडीबुटी विक्रेता विजयसिंह चितोडिया आणि राजकुमार चितोडिया यांच्यात विषबाबत चर्चा झाली. ठरल्यानुसार ५० हजारांत विष देण्याचे ठरले. विष विकत देण्यासाठी पैशाच्या देवाणघेवाणीची ‘डिल’ वर्ध्याच्या बसस्थानक परिसरात झाल्याची माहितीही आरोपींनी पोलिसांना दिली.
विषाची शिशी अन् इंजेक्शन केले जप्त
ज्या दारूच्या बाटलीत इंजेक्शनच्या साहाय्याने विष इंजेक्ट करण्यात आले. ते इंजेक्शन आणि विषाची शिशी सेलू पोलिसांनी जप्त केली आहे. ज्या ठिकाणी आरोपी संदीपने इंजेक्शन आणि विषाची शिशी फेकली होती. त्या ठिकाणचा पंचनामाही करण्यात आला आहे.
पूलगावात विकायचा जडीबुटी
आरोपी विजयसिंह आणि राजकुमार हे दोघेही पूलगाव शहरात, तसेच लगतच्या परिसरात जडीबुटीची छोटी दुकाने थाटून जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करायचे. इतकेच नव्हे, तर विजयसिंहचे काही नातेवाईकदेखील पूलगाव शहरात जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
सेलू पोलीस जाणार चंद्रपूरला
आरोपी विजयसिंह डिड्डसिंह चितोडीया हा मुळचा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून तो अमरावती शहरात वास्तव्य करीत होता. तसेच तो पूलगाव शहरात जडीबुटी विकायचा. त्याने कोणत्या प्रकारचे विष दिले. ते आणले कोठून, त्याला विष कुणी दिले. हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने सेलू पोलिसांची एक चमू आरोपी विजयसिंहच्या मूळ गावी चंद्रपूर येथे जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे आणखी काय खुलासे आरोपी करतील, याकडे आता लक्ष लागले आहे.