वर्धा : फेसबुकवर असलेल्या जनावरे खरेदी विक्रीच्या ग्रुपमधील दोन गायींचा सौदा करून दूध व्यावसायिकाची तब्बल ३५ हजार ५०१ रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार वरूड गावात उजेडात आला. याप्रकरणी १५ एप्रिल रोजी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशील प्रकाश ताकसांडे (रा. वरूड) हा दुधाचा व्यवसाय करतो. यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी तो फेसबुकवरील एका ग्रुपवर गायी, म्हशी विक्री संदर्भातील माहिती आणि फोटो पाहत असतानाच त्याला दोन गायी आवडल्या. त्याने त्या गायी खरेदी करण्यासाठी ग्रुपमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला. अज्ञात भामट्याने व्हॉट्सॲप क्रमांकावर सुशीलला तब्बल १२ गायींचे छायाचित्र पाठविले.
एक गाय २२ हजार रुपये आणि १ गाय ३० हजार रुपये व ट्रान्सपोर्टचे ५ हजार रुपये असे एकूण ५७ हजार रुपयांत दोन गायी पाठविण्याचा सौदा झाला. १५ एप्रिल रोजी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर पेटीएमद्वारा पैसे पाठविले. असे एकूण ३५ हजार ५०० रुपये सुशीलने पाठविले. त्यानंतर दोन अनोळखी क्रमांकावरून सुशीलला सतत कॉल आले आणि पुन्हा २१ हजारांची मागणी करू लागले. अखेर सुशीलला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने थेट सेवाग्राम पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली.