समुद्रपूर (वर्धा) : कोरोनाकाळात शेतकरी शेतात गेला नसल्याने शेतजमीन पडीक राहिली. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने आपणच या शेतीचे मालक असल्याचे दाखवून चक्क शेतजमीनच विकल्याचा प्रकार समुद्रपूर तालुक्यातील मौजा घोरपड येथे उघडकीस आला आहे.
यासंदर्भात शेतकरी जगदीश ऋषी पाटील यांनी गिरड पोलिसांत २८ एप्रिलला तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे आरोपीने शेतकऱ्याच्या नावाचे खोटे आधार कार्ड तयार करून परस्पर विक्री केल्याचा आरोप जगदीश पाटील यांनी केला आहे.
समुद्रपूर तालुक्यातील मौजा घोरपड येथील सर्व्हे नं. १६२ मौजा नं. ५८, मधील शेतकरी संतोष केशवराव मोंढे यांचे नावे असलेली जमीन ५ सप्टेंबर २००६ रोजी जगदीश ऋषी पाटील (रा. बनवाडी, नागपूर) यांनी खरेदी केली. त्यांनी आपल्या नावाने ७/१२ करून कब्जासुद्धा मूळ मालकाकडून करून घेतला. ते नेहमी या शेतात जायचे. मात्र २०२० पासून कोरोनाकाळात शेतावर गेले नाही. याचा फायदा गैर अर्जदाराने घेत जानेवारी २०२१ मध्ये जमीन विकल्याचे उघडकीस आले.
जगदीश पाटील यांच्या ऐवजी दुसऱ्या अज्ञात व्यक्तीला उभे करून जमीन परस्पर गैर अर्जदाराने विकले. याप्रकरणी अद्याप जमीन विक्रेता आणि साक्षिदार यांची चौकशी करून न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी जगदीश पाटील यांनी गिरड पोलिसांत केलेल्या तक्रारीतून केली आहे. याप्रकरणी गैर अर्जदार भालेराव पांडुरंग गवळी, अधिक दहा व्यक्ती व तलाठी यांच्याविराेधात नावाची तक्रार केली आहे. पुढील तपास गिरडचे ठाणेदार दहीभाते करीत आहेत.