देवळी (वर्धा) : युवक दारूच्या आहारी गेल्याने चिंतेत असलेल्या परिवाराने दारू सोडविण्याकरिता एका महाराजाकडील औषधोपचार सुरू केला. पण, हा औषधोपचार जीवघेणा ठरल्याने परिवाराला कर्ता युवक गमवावा लागला. ही घटना शहरात घडल्याने परिवारावर मोठा आघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील काळापूल परिसरातील रहिवासी स्वप्निल रमेश भोयर (२७) याला काही दिवसांपासून दारूचे व्यसन लागले होते. घरचा कर्ता मुलगा असल्याने घरातील मंडळीत काळजीत होती. त्यांना समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील एक महाराज औषधोपचाराने दारू सोडवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मृताच्या आईने स्वप्निलला शेडगावला नेऊन महाराजाची भेट घेतली.
महाराजाने दिलेले औषध घेऊन ते गावाकडे निघाले. यादरम्यान देवळीतील पुलगाव चौकात स्वप्निलला गुंगी येऊन तो खाली कोसळला. त्यानंतर ऑटोत टाकून त्याला घरी आणले व आराम करण्यास सांगितले. सायंकाळी त्याला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, पण तो मृतावस्थेत आढळून आला.
यावेळी त्याच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याचे दिसून आले तसेच काखेत आणि इतर भागांवरही रक्त दिसले. परंतु हे रक्त लाल मुंग्या चावल्याने निघाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. मृताची दारूच्या व्यसनाने प्रकृती चांगलीच खालावली होती. वारंवार सांगूनही दारू सुटत नसल्याने आईने महाराजाच्या औषधाचा आधार घेतला, पण हेच औषध मुलाच्या जीवावर बेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक खेकाडे करत आहे.