आवाहन : सूचनांचे पालन करणे अनिवार्यवर्धा : सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात खोवा, मिठाई व दुग्धजन्य पदार्यांपासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था, पूजा संपन्न करणारी मंडळांनी अन्न सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, (भा.से.) यांनी केले आहे.याकरिता अन्न व औषध प्रशासन विभागाने मार्गदर्शन सूचना आखल्या असून त्यांचे पालन करण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले आहे. दरवर्षी जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेश उत्सव दरम्यान जिल्ह्यातील गणेश मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारची मंडळे प्रसाद किंवा भोजन वाटपासारखे कार्यक्रम आयोजित करतात. याप्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांकडून काही प्रमाणात दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधेसारखी अप्रिय घटना घडू शकते. याप्रकारचे कार्यक्रम आयोजित करणारी गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारची मंडळांनी अन्न सुरक्षेच्या कायद्याचे पालन करावे. प्रसादाचे उत्पादन करताना सदरचा प्रसाद मानवी सेवनास सुरक्षित राहिल यांची खात्री करावी. आवश्यक तेवढ्याच प्रमाणात प्रसादाची निर्मिती करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करावी. प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास अॅप्रन, ग्लोव्हज, टोपी इत्यादी साहित्य पुरविण्यात यावे. प्रत्येकवेळी त्या स्वयंसेवकाने हात स्वच्छ धुवावेत. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही त्वचारोग व संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. प्रसाद तयार करण्याकरिता खवा, मावा यासारख्या नाशवंत अन्न पदार्थांचा वापर होत असल्यास विशेष काळजी घ्यावी. दुध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील असे विशेषत ४ डि.से. अथवा कमी तापमानावरच साठवणूकीस ठेवावेत. मंडळानी कच्चा मालाचे खरेदी बिल, प्रसाद करणाऱ्याचे व स्वयंसेवकाचे नाव, पत्ता याचा अभिलेख अद्यावत ठेवावा, आदी सूचनांचा समावेश आहे.(स्थानिक प्रतिनिधी)प्रसाद तयार करताना स्वच्छता पाळावीप्रसाद तयार करताना स्वयंपाक तयार करण्याची जागा स्वच्छ, निटनेटकी व आरोग्यदायी असावी. प्रसादाकरिता लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावे. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, निटनेटकी व झाकण असलेली असावी. फळांचा वापर करताना खरेदी क्षेत्रातील परवाना नोंदणी धारकाकडून खरेदी करावी अशा सूचनांचा समावेश आहे.
मंडळांनी महाप्रसादासाठी अन्न सुरक्षेची काळजी घ्यावी
By admin | Published: September 08, 2016 12:44 AM