लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: पिपरी (मेघे) येथील नवविवाहित तरुणाच्या निकट संपर्कातील व्यक्तींपैकी चार व्यक्तींचे कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्धा शहरासह वर्धा शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण १२ चमू विशेष प्रयत्न करणार असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वर्धा उपविभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या नऊ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवार १३ जुलै रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय वर्धा शहरासह शहराशेजारील रहिवासी असलेल्या नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. संचार बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेवाग्राम, सावंगी (मेघे), रामनगर, वर्धा शहर या चार पोलीस स्टेशन मधील ठाणेदारांच्या नेतृत्त्वातील प्रत्येकी एक चमू, गटविकास अधिकारी स्वाती इसाये यांच्या नेतृत्त्वातील दोन चमू, महसूल विभागाच्या तीन चमू तसेच वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या नेतृत्त्वातील तीन चमू विशेष प्रयत्न करणार आहेत.मोजकीच सेवा राहणार सुरूउपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांच्या आदेशानुसार बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, आलोडी, म्हसाळा, साटोडा, पिपरी (मेघे), उमरी (मेघे) या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पुढील तीन दिवस केवळ औषधी दुकाने, दवाखाने, दूध, वर्तमान पत्र वाटप, अत्यावश्यक शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत.सध्याच्या कोरोना संकटात यापूर्वी वर्धेकरांनी जिल्हा प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १३ जुलैपर्यंत वर्धा शहरासह शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासाठी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. स्वत: कोरोनामुक्त राहण्यासाठी पुढील तीन दिवस नागरिकांनी घरातच रहावे. तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी वर्धा.